कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या, पात्र शेतकर्‍यांना पीक कर्ज


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरून ग्रीन लिस्टमध्ये नाव असणार्‍या मात्र कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांना जिल्हा बँका व व्यापारी बँकांनी येत्या हंगामासाठी पिक कर्ज देण्याची आदेश राज्य सरकारच्या सहकार विभागाने दिले आहेत. या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यासमोर शासनाकडून येणे बाकी असा शेरा लिहून संबंधीत शेतकर्‍यांना पिक कर्ज देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील 47 हजार शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

सहकार विभागाने शुक्रवारी काढलेल्या आदेशात महात्मा जोतिराव फुले होतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेतंर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर योजनेंतर्गत लाभ देण्यात आला नाही, अशा लाभार्थ्याना थकबाकीदार न मानता खरीप 2020 साठी पीक कर्ज देण्याचे आदेश आहेत.

जिल्हा सहकारी बँकांनी कर्जमुक्ती योजनेतंर्गत या थकबाकीदार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे बाकी असे दर्शवावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी या अनुषंगाने संबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना कळवावे आणि संबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी अशा शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी व त्यांनी खरीप 2020 साठी पीक कर्ज द्यावे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा सहकारी बँकांनी 1 एप्रिल 2020 पासून ही कर्जाची रक्कम त्यांना प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत संबंधीत बँकांनी व्याज आकारणी करावी. शासनाकडून संबंधित जिल्हा बँकेला असा निधी व्याजासह अदा करण्यात येईल, असे सहकार खात्याच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच याप्रमाणे व्यापारी बँका व ग्रामीण बँकेतील खातेदार शेतकर्‍यांना पिक कर्ज देण्याचे सहकार खात्याने आदेश दिले आहेत. नगर जिल्ह्यातील 47 हजार पात्र शेतकर्‍यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी असल्याने त्यांना या निर्णयामुळे पिक कर्ज मिळणार आहे.

1 हजार 465 कोटींची कर्जमाफी
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले होतकरी कर्जमुक्ती योजना 2019 नुसार 1 हजार 465 कोटी रुपयांची कर्जमाफी दिलेली आहे. या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 495 शेतकर्‍यांना लाभ मिळालेला आहे. उर्वरित 47 हजार शेतकर्‍यांची कर्जची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post