करोना लॅबला आयसीएमआरकडून मान्यता



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशी कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा (कोविड-१९ अर्थात कोरोना टेस्टलॅब) उभारण्यात आली असून इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, नवी दिल्ली (आयसीएमआर) यांनी त्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूरच्या निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल (डॉ) विभा दत्ता यांनी यासंदर्भात पत्राद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना पत्राद्वारे कळवले आहे.

            जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने यासाठी केलेले प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर आणि त्यांचे सहकारी वारंवार यासाठी तांत्रिक बाबी आणि आवश्यक मानके पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाही करीत होते. आज अखेर या प्रयत्नांना यश आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेली ही कोरोना टेस्ट लॅब आयसीएमआरच्या मानकांनुसार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वारंवार लॅबला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हेही वारंवार जिल्हाप्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्याशी संपर्क साधून लॅबच्या उभारणीबाबत माहिती घेत होते. त्यांनीही या लॅबची केवळ २० दिवसांत उभारणी केल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

            लॅबची उभारणी पूर्ण झाल्यानंतर चाचणी स्वरुपात औरंगाबाद येथील एका रुग्णाचा घशातील स्त्राव तपासणीसाठी काल या लॅबकडे पाठविण्यात आला. त्यानंतर त्याचे लॅबमध्ये पृथ:करण करुन तो अहवाल नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. तत्पूर्वी लॅबमधील पायाभूत सुविधा दिलेल्या निर्देशांप्रमाणे निर्माण केल्याची खात्री करण्यात आली. स्त्राव अहवालाचे परीक्षण करण्यात आले. तो बरोबर आल्यानंतर तसा अहवाल आयसीएमआरकडे पाठविण्यात आला. आयसीएमआरने सर्व निकष पूर्ण करीत असल्याचे स्पष्ट करीत या कोरोना टेस्ट लॅबला चाचणीसाठी अधिकृत मान्यता देत असल्याचे सांगितले.

            या मान्यतेमुळे आता जिल्ह्यातील कोरोनाची लक्षणे जाणवणार्‍या व्यक्तींची चाचणी येथेच करणे शक्य झाले आहे. एका पाळीत १०० असे २४x७ वेळ लॅब सुरु ठेवण्यास ३०० चाचण्या घेणे शक्य होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन पाळीत काम केले जाणार असून दिवसाला २०० चाचण्या अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

            जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील रुग्णांच्या कोरोनासंदर्भातील चाचण्या सुरुवातीला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) आणि नंतर लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्या जात आहेत. येथे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेली लॅब आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तयार करण्यात आल्याने आता चाचण्या येथेच करण्यात येणार आहेत.                                            ****

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post