एसटी बसची होणार माल वाहतूक ट्रक




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोना संसर्गाचा विळख्यामुळे राज्याची सर्वसामान्यांची लाईफलाईन असणारी एसटी बस दोन महिन्यांपासून आगारात लॉकडाऊन झाली. यामुळे एसटीवर अवलंबून असणार्‍या हजारो कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आता चार दिवसांपासून हळूहळू टप्प्या टप्प्याने एसटी धावण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूकीसोबतच माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटीच्या आगारात एसटी बससोबत माल वाहतूक ट्रकची बांधणी होत आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आगारातून माल वाहतुकीसाठी पहिल्या ऑर्डर मिळाली असून त्याची बोलणी अंतिम टप्प्यात आहे.

राज्यात एसटी महामंडळाचे 250 हून अधिक आगार असून 600 च्या जवळपास बसस्थानके आहेत. यात नगर जिल्ह्यात 11 आगर आणि 16 बसस्थानके आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अधिकच्या काळापासून या ठिकाणी सर्व काही ठप्प आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने रेड झोन वगळता अन्य ठिकाणी टप्प्याने एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच एसटी महामंडळाच्या सेंट्रल विभाागने आता एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार जिल्ह्यात देखील एसटी महामंडळाच्या प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

सध्या याबाबत महामंडळाच्या सेट्रल विभागाकडून स्पष्ट सुचना नसल्या तरी स्थानिक वाहतुकीच्या दरात निगोशियट (कमी अधिक) करून एसटी महामंडळाने माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी एसटीच्या श्रीरामपूर आगाराला माल वाहतुकीची पहिली ऑर्डर मिळाली असून त्यावर बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे नगर जिल्ह्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.

एसटीव्दारे माल वाहतुकीसाठी प्रत्येक आगारात काही एसटी बसची रचना ट्रकमध्ये करण्यात येणार आहे. यात प्रत्येक आगाराला मागणीनूसार किती ट्रक मिळतील याचे नियोजन एसटीचा सेंट्रल विभाग करणार आहे. सध्या प्रत्येक आगारात दोन ते तीन ट्रक एसटी बसेसच्या साहित्य, टायर वाहतुकीसाठी उपलब्ध असून त्याव्दारे जिल्ह्यात माल वाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता व्यापारी, शेतकरी आणि अन्य व्यक्तींनी खासगी वाहतुकीपेक्षा किफायतशीर दर आणि अधिक सुरक्षितपणे आपल्या मालाची वाहतूक करता येणार असून एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीला हातभार लागणार आहे.

चार दिवसांत अवघे 2 हजार प्रवासी
गेल्या शुक्रवारपासून जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आणि निवडक गावात एसटी महामंडळाच्या बसेस धुराळ उडवित धावतांना दिसत आहे. मात्र, करोना संसर्गामुळे लोक घराबाहेर पडत नसल्याने प्रवास कोण करणार असा प्रश्न आहे. यामुळे गेल्या चार दिवसात जिल्हाभरातून संगमनेर वगळता एसटीच्या वाट्याला अवघे 1 हजार 962 प्रवासी आले आहेत. या चार दिवसांत एसटी महामंडळाने जिल्ह्यात 93 बसेस व्दारे 422 फेर्‍या मारल्या आहेत. सोमवारी तर जिल्ह्यात अवघ्या 17 बसेस धावल्या आणि त्यांनी 60 फेर्‍यात 318 प्रवाशांची वाहतूक केली असल्याची माहिती जिल्हा विभाग नियंत्रक गिते यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post