उत्तर प्रदेशमधील १२२५ मजुरांना घेऊन विशेष रेल्वे अहमदनगरहून रवाना


यंत्रणेतील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सहकार्याने भारावले मजूर

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश मधील १२२५ मजुरांना घेऊन अहमदनगर ते उन्नाव विशेष रेल्वे रवाना झाली आणि या मजुरांच्या चेहर्‍यावर आनंद उमटला. महाराष्ट्र शासनाचा विजय असो असे म्हणत आणि स्थानिक प्रशासनाला धन्यवाद देत या मजुरांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालयआणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्व प्रवाशांसोबत नाष्टा-अन्न पाकीटे, पाण्याची बाटली दिली आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

दुपारी १ वाजल्यापासूनच जिल्ह्याच्या विविध भागात काम करणारे उत्तर प्रदेशमधील हे मजूर अहमदनगर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. विशेष बसने संबधित महसूल यंत्रणेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत त्यांना रेल्वे स्टेशनवर दाखल केले. नंतर त्यांना रेल्वे डब्यात बसवण्यात आले. यावेळी या प्रवाशांनी राज्य शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणांचे आभार मानले. महसूल, पोलीस यंत्रणेने आमच्यासाठी खूप धावपळ केली. आमच्या घराकडे जाण्यासाठी मदत केली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सायंकाळी साडेपाच वाजता अहमदनगरहून ही रेल्वे लखनऊकडे रवाना झाली. नगर, पारनेर, राहुरी, जामखेड, कर्जत तालुक्याच्या विविध भागात काम करणारे मजूर आज उत्तरप्रदेशकडे रवाना झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, मध्य रेल्वेचे मुख्य तिकिट निरीक्षक डी. एल. तागडे आणि एन.डी. थोरात, तिकीट तपासनीस निरीक्षक आर. एस. मीना, स्टेशन मास्टर अनिल तोमर, तहसीलदार ज्योती देवरे, तहसीलदार उमेश पाटील, तहसीलदार वैशाली आव्हाड,पोलीस निरीक्षक विकास वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

काहीजण कुटुंबासह तर काहीजण केवळ नोकरीसाठी एकटेच जिल्ह्यात आले होते. सुपा एमआयडीसी, नागापूर येथील एमआयडीसी सह विविध भागात हे मजूर काम करीत होते. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्यांना परतावे लागले. केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील तालुकास्तरीय महसूल यंत्रणांना परराज्यातील मजुरांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, परराज्यात जाऊ इच्छिणार्‍या नागरिकांची यादी तयार करण्यात आली. काल शिर्डी येथून तर आज अहमदनगरहून विशेष रेल्वे रवाना झाली.

परतीच्या प्रवासातही महसूल आणि पोलीस प्रशासनाने घेतलेली काळजी त्यांना विशेष भावली. त्यामुळेच त्यांनी राज्य शासनाचा जयघोष केला आणि आनंदाने रवाना झाले.

गेली कित्येक दिवस या मजूरांच्या घरवापसीसाठी प्रयत्न करणार्‍या महसूल आणि पोलीस यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांनाही केलेल्या कामाचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर उमटले.

दरम्यान, आज रात्रीही १२०० मजुरांना घेऊन विशेष रेल्वे भोपाळकडे रवाना होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post