१ जूनपर्यंत सिद्धीबागे जवळील पाईप गटारीचे काम पूर्ण करा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : दिल्लीगेट पत्रकार चौक दरम्यानचा रस्ता सावेडी उपनगराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. गेल्या १ वर्षापासून सिद्धीबागेजवळील रस्त्याचे काम धिम्यागतीने आजतागायत सुरु आहे. आजही हे काम पूर्ण झालेले नाही. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या रस्त्यावर जणू नदीचे स्वरूप प्राप्त होत असल्यामुळे या भागातील दुकानदार व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधी या ठिकाणी पाईप गटारीचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आधी रस्त्याचे काम झाले व आता पाईप गटारीचे काम होणार आहे. या कामासंबंधीत अधिकारीच दोषी आहेत. कुठल्याही कामाचे पूर्व नियोजन न केल्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांच्या चुकामुळे त्रास सहन करावा लागतो. तरी पावसाळ्यापूर्वी म्हणजे १ जूनपर्यंत गटारीचे व फुटपाथचे काम पूर्ण करुन द्या, अशा सूचना आ. संग्राम जगताप यांनी अधिकाऱ्यांना यावेळी पाहणी दरम्यान दिल्या.
सिद्धीबाग जवळील रस्त्याची व साईट गटारीच्या कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, मा.नगरसेवक अँड. धनंजय जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेशमा आठरे, अँड. शारदा लगड,
शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, संजय ढोणे, बांधकाम विभागाचे अधिकारी भोसले व राजभोज आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जगताप पुढे म्हणाले की, या भागातून शहरातील दोन नाल्यांचे पाणी वाहत आहे. याचे पूर्वनियोजन होणे गरजेचे होते. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आजतागायत ते झाले नाही. यापुढील काळात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. शहरामध्ये दर्जेदार कामे व्हावी व नियोजनपूर्वक कामे करावी. पुन्हा पुन्हा तिच विकास कामे करण्याची गरज पडणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. शहराचा शास्वत विकास हाच आमचा ध्यास आहे. त्याप्रमाणे आम्ही शहरामध्ये काम करत आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी अँड. धनंजय जाधव यांनी अनेकवेळा हे काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी महापालिका व बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु होता. आ. संग्राम जगातप यांच्या मदतीने या कामास गती मिळाली आहे. लवकरच हे काम पूर्ण होण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो.
Post a Comment