पाथर्डीतील कोरोनाबधिताला दिलासा; जिल्ह्यातील १४ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १४ अहवाल निगेटीव आले आहेत. तर पाथर्डी येथील कोरोना बाधित व्यक्तीला काल डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१ झाली आहे.
आज सायंकाळी हे प्रलंबित १४ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. निगेटीव आलेल्या अहवालात शेवगाव येथील ०१, जामखेड ०२, संगमनेर-०१, राहाता- ०२, नगर शहर- ०५, अकोले ०१, राहुरी ०१ आणि कोपरगाव येथील ०१ व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथील मोहोज देवढे येथील शेतकरी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रुग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार बाधित व्यक्तीला दहा दिवसातं कोणताही त्रास होत नसेल, त्याची प्रकृती चांगली असेल तर त्याला डिस्चार्ज देण्यात येऊन घरीच १४ दिवस क्वारंटाईन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या रुग्णाला काल डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १८३२ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १७३० जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या एकूण १८ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Post a Comment