'या' भागात 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेसह संपूर्ण लॉकडाऊन



माय अहमदनगर वेब टीम
 अहमदनगर - जिल्ह्याच्या कोरोनाचा उद्रेक झालेल्या संगमनेर शहरातील काही भाग, नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगारजवळील आलमगीर आणि जामखेड शहर हे कोरोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी रात्री 11 वाजता घोषीत केले आहे. या सर्व ठिकाणी आज सकाळी 6 वाजेपासून ते 14 एप्रिलला रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार,आस्थापना, येणे आणि जाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा, नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगार जवळील आलमगीर आणि जामखेड शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या क्षेत्राला जिल्ह्यातील हॉटस्पॉट पॉकेट घोषीत केले आहे. या भागाच्या भागाच्या मध्यबिंदूपासून दोन किलो मीटरचा परिसर हा कोरोना क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

यामुळे या भागातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री आदी हे आज शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून 14 एप्रिलच्या रात्री 12 पर्यर्ंत बंद राहणार आहेत. तसेच या भागातील व्यक्तींना घराच्या बाहेर सोडा तर येथून ये-जा देखील करता येणार नाही.

स्थानिक प्रशासनाने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी 24 बाय 7 अशी कंट्रोल रुम तयार करण्यात यावीत, त्या ठिकाणी 3 ते 4 अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, प्रत्येक शिफ्टच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे मोबाईल नंबर प्रसिध्द करण्यात यावेत, या ठिकाणी रजिस्टर ठेऊन त्यात नोंदी ठेवण्यात याव्यात, या भागातील नागरिकांना अत्यावश्यक असणरे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे, आदी योग्य शुल्क आकारून शासकीय यंत्रणे मार्फत पुरवठा करण्यात यावा, या भागात बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पोलिसांनी सर्व पर्यायी रस्ते बंद करून एकच मुख्य रस्ता सुरू ठेवावा, या ठिकाणी सेवा देणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना त्या त्या विभागाचे ओळख पत्र देण्यात यावेत, तसेच ऐवढे करून ही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास या भागातील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आणण्यात यावा, असे आपल्या आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जिल्हा सरकारी रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरूवारी सकाळपर्यंत 122 कोरोना संशयीत व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान, गुरूवारी सकाळी 61 व्यक्तींची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामध्ये जिल्ह्यात कोरोना बाधीत सापडल्या. तिसर्‍या व्यक्तीच्या 14 दिवसानंतरच्या दुसर्‍या अहवालाचा समावेश आहे. दरम्यान, या तिसर्‍या बाधीत व्यक्तीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असून येणार्‍या अहवालात त्याचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो कोरोनामुक्त होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post