'त्या' 24 तबलिगींना पोलीस कोठडी ; तिघा भारतीयांना न्यायालयीन कोठडी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना पॉझिटिव्ह असतानाही जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा तबलिगींचा उद्देश काय?, त्यांना निवारा व अर्थसहाय्य कोणी केले याचा तपास आता नगर पोलिसांनी सुरू केला आहे. नगर पोलिसांच्या अहवालामुळेच अटक केलेल्या 24 तबलिगीना कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक तिघांना मात्र कोर्टाने न्यायलयीन कोठडी दिली.

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर 29 विदेशी नागरिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यात पोहचले. नगर पोलिसांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर त्यातील काही कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. पर्यटन व्हिसाचे तसेच साथ रोग अधिसुचनेचे उल्लंघन केले म्हणून 29 परदेशीसह 6 स्थानिकांविरोधात नेवासा, जामखेड, भिांगार पोलिसात गुन्हे दाखल आहेत. या सगळ्याचा गुन्ह्याचा तपास नगर एलसीबी पोलीस करत आहेत. जामखेडमधील 12 (त्यात 3 भारतीय), नेवाशातील 9, मुकुंदनगरमधील 8 अशा 24 विदेशी व तीन स्थानिक अशा 27 जणांची शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमधून सुटका झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
अटकेतील या सगळ्यांना शनिवारी नगरच्या कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी पोलिसांनी कोर्टासमोर अनेक संशय असलेला रिपोर्ट सादर केला. त्यानुसार कोर्टाने 24 विदेशी नागरिकांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर तिघा स्थानिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावलेले तिघे भारतीय हे गुजरातमधील आहेत. त्यांच्या जामिनासाठी लगेचच अर्जही दाखल करण्यात आला. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन नामंजूर केला. नगरच्या सबजेलमध्ये जागा नसल्याने या तिघांना पारनेर सबजेलमध्ये पाठविण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post