मुंबई आणि नवी मुंबईतील शाळा, जिम, स्वीमिंग पूल, नाट्यगृह बंद ! पुणे-पिंपरीतील शाळा बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील शाळा, जिम, स्वीमिंग पूल आणि नाट्यगृह बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना शुक्रवारी ही घोषणा केली. सोबतच, पुणे आणि पिंपरी-चिंचवळ या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे, या ठिकाणी सुद्धा शाळा बंद ठेवण्यात याव्या असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. खासगी शाळा सुद्धा आपल्या पद्धतीने सुट्ट्या आणि बंद घोषित करत आहेत. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. कोरोना व्हायरसमुळे घाबरून सर्वच बंद करता येणार नाही. यामुळे, राज्यात भीतीचे वातावरण तयार होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी -मुख्यमंत्री
राज्यात खासगी कंपन्या, कारखाने आणि संस्थांचे असंख्य कर्मचारी आहेत. अशा कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य असेल तर वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी. शक्य असेल तर आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची व्यवस्था करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
रेल्वे, बस सेवा बंद करता येणार नाहीत
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी बस आणि रेल्वे सेवा थांबवा अशीही मागणी होती. परंतु, या अत्यावश्यक सेवा आहेत. सर्वांना पॅनिक करून आवश्यक सेवा बंद करता येणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी मध्यरात्रीनंतर होणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
Post a Comment