कोरोनामुळे जागतिक महारोगराई जाहीर; मुंबई शेअर बाजार 2600 अंकांनी गडगडला


इतिहासातील सर्वात मोठी घसरण

माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- सेन्सेक्समधील घसरण वाढत चालली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता सेन्सेक्स 2600 अंकांपर्यंत कोसळला. सेन्सेक्स 33,202.85 अंकावर व्यापार करत आहे. 2600 अंकांच्या घसरण इंट्राडे व्यापारात सेन्सेक्सची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. सोमवारी सेन्सेक्स इंट्राडे व्यापार 2467 अंकांनी गडगडला होता. तर निफ्टी देखील 701.90 अंकांनी घसरून 9746 अंकांवर पोहोचला आहे. हा निफ्टीचा 31 महिन्यांतील सर्वात निचांकी स्तर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महारोगराई जाहीर केल्यानंतर जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरल आहे. त्यातच भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटकाही शेअर बाजाराला बसला आहे.

कोरोना व्हायरस आणि अमेरिकेसह जगभरातील बाजारांमधील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारात देखील पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या निर्देशांक डाओ जोन्समध्ये पुन्हा एकदा विक्रमी घसरण झाल्यानंतर नास्डॅक, एफटीएसई, कोस्पी, निक्केईसह सर्व प्रमुख निर्देशांकही कोसळले. गुरुवारी बीएसईचे शेअर निर्देशांक सेन्सेक्स 1821.27 अंकांच्या घसरणीनंतर सुरु झाला. सेन्सेक्स 34,003.58 अंकांवर व्यवहार करत आहे. अशाचप्रकारे निफ्टी 470 अंकांच्या घसरणीसह 9,990.95 अंकांवर व्यापार करत आहे.

1,464 अंकांनी डाउ जोन्स कोसळला
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यूके व्यतिरिक्त इतर युरोपीय देशांतील प्रवासावर बंदी घातली आहे. शुक्रवारी लागू करण्यात आलेली बंदी पुढील 30 दिवसांसाठी कायम राहणार आहे. या घोषणेनंतर डाउ जोन्सने पुन्हा एकदा घसरणीचा इतिहास रचला. डाउ जोन्समध्ये 1464 अंकांची घसरण झाली आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी डाउ जोन्सने 1190.95 अंकांच्या घसरणीसह रेकॉर्ड स्थापित केला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post