... तर IPL खेळू नका!


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक क्रिकेट मालिकांमुळे खेळाडूंवर अतिरिक्त ताण येतो. अनेक खेळाडू यावर नाराजी व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भविष्यात संघाला थेट मैदानात लँड करावे लागेल असे म्हटले होते. आता भारताचे माजी कर्णधार कपील देव यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

जर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेड्यूल फार व्यग्र वाटत असेल किंवा दगदग होत असेल तर त्यांनी आयपीएल खेळू नये, असे मत कपील देव यांनी व्यक्त केले आहे. अति क्रिकेट होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आयपीएल खेळू नका. आयपीएल मध्ये तुम्ही देशासाठी खेळत नसता. त्यामुळे तुमची दगदग होत असेल तर आयपीएलच्या काळात ब्रेक घेण्यास हरकत नाही. तुम्ही जेव्हा देशासाठी खेळत असता तेव्हा वेगळी भावना असते, असे कपील म्हणाले.

देशासाठी जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करता येत नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा अति क्रिकेटचा ताण नसल्याचे कपील म्हणाले.

थकवा ही एक मानसिक अवस्था आहे. जेव्हा तुम्ही धावा करत नाही किंवा तुम्हाला विकेट मिळत नाही तेव्हा थकवा वाटतो. दिवसभरात २० ते ३० ओव्हर टाकून सात विकेट घेतल्यानंतर तुम्ही थकत नाही. पण १० ओव्हरमध्ये ८० धावा देत एकही विकेट मिळत नाही तेव्हा तुम्ही अधिक थकता. मैदानावरील कमगिरी तुम्हाला आनंदी ठेवत असते, असे कपील यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post