कोरोना विषाणू : मुंबई विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची तपासणी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : कोरोना विषाणूबाधित भागातून आलेल्या राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असलेल्या 41 पैकी 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुणे, मुंबई येथे प्रत्येकी एक जण दाखल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात बाधित भागातून १७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ९० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यामध्ये काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ४० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरिता करण्यात येतो आहे.
Post a Comment