इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांना काळे फासू : तृप्ती देसाई


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : इंदोरीकर महाराजांनी महिलांबाबत अपमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा अकोल्याला जाऊन महाराजांना काळे फासू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला.

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी देसाई आज दुपारी नगरला आल्या. त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर कारवाई व्हायला हवी. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. महाराजांच्या अकोले तालुक्यातील घरी जावून त्यांना काळे फासवू. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी.

दरम्यान, देसाई नगरला येवू नये म्हणून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी त्यांना आव्हान दिले होते. नगरला आल्यास त्यांना मारहाण करण्याबाबत धमकी देवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नगर-पुणे मार्गावर सुपेजवळ अष्टेकर यांना ताब्यात घेतले होते. तसेच देसाई यांना नगरला येण्यासाठी जे कोणी आडवे येईल, त्यांच्यावरही कारवाईचा इशारा दिला होता, त्यामुळे त्यांना अटकाव झाला नाही. त्याबरोबर इंदोरीकर महाराजांनीही त्यांच्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले होते, त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा विरोध आज मावळलेला दिसून आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post