छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भोवला ; श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर कारवाई केली असून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भातील निकाल नगरविकास विभागाने शुक्रवारी (दि.28) दिला आहे.

छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर नगर महापालिकेने 26 फेब्रुवारी 2018 रोजी विशेष सभा घेऊन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाला मंजुरीसाठी 9 मार्च 2018 रोजी सादर केला होता. हा अहवाल आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 13 (1) (अ) मधील तरतुदींनुसार छिंदमला नोटिस बजावण्यात येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच, तत्कालीन राज्यमंत्री, नगरविकास यांच्याकडे 17 ऑक्टोबर 2018, 5 ऑगस्ट 2019 आणि 22 ऑगस्ट 2019 रोजी सुनावण्या झाल्या. परंतु, त्यावर काहीही निर्णय झाला नाही. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवारी (दि.27) सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहाण्यास नकार दर्शवत छिंदमनी यापूर्वी सादर केलेले म्हणणे ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा ठराव, आयुक्तांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल आणि आजवर अवलंब केलेल्या प्रक्रियेचा विचार करून छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. महापुरुषांच्या नावाने राज्याच्या प्रशासनाचे काम चालते. असं असतानाच लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल अशाप्रकाराची वक्तव्य केली जात असतील तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो असं निकाला दरम्यान नगरविकास विभागाने स्पष्ट करत छिंदमचे नगरसेवक पद काढून घेण्याचा निर्णय दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post