कर्मचारी संपावर ; बँकांचे कामकाज विस्कळीत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- बँक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या द्विपक्षीय कराराला आय. बी. ए. कडून होत असलेल्या विलंबामुळे बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा करार लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी आय. बी. ए. चे लक्ष वेधण्यासाठी बँकांमधील अग्रणी युनाइटेड फोरम ऑफ बँक्स युनिअन्सने दि. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा बंद पुकारला असून या काळात शहरात याप्रसंगी यूको बँक चितळे रोड येथे बँक कर्मचारी व अधिकार्‍यांची सभा घेण्यात येवून निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी कॉ.सुजित उदरभरे, कॉ.उल्हास देसाई, कॉ.माणिक अडाणे, कॉ.गिरिष देशपांडे, कॉ.सायली शिंदे, कॉ.संदिप फंड, कॉ. विकास निकाळजे, कॉ.प्रकाश कोटा, कॉ.अच्युत देशमुख आदिंसह बँक कर्मचारी उपस्थित होते. या संपास राज्य कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला, यावेळी सुभाष तळेकर, पेद्राम आदि उपस्थित होते.

यावेळी कॉ. उल्हास देसाई म्हणाले, बँक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या द्विपक्षीय कराराची मुदत 31 ऑक्टोबर 2017 ला संपली व 1 नोव्हेंबर 2017 पासून नवीन वेतन श्रेणी लागू व्हावयास होती. यासाठी संघटनांनी मुदत संपण्यापूर्वीच आपल्या मागण्या आय. बी. ए. ला सादर केल्या होत्या. परंतु आईबीए ने अत्यंत संथ गतीने वाटाघाटीस सुरवात केली व आज 27 महिने पूर्ण होऊन सुद्धा कोणताही निर्णय झालेला नाही. वाटाघाटीच्या पहिल्या सभेत आय. बी. ए. ने बँक कर्मचारी व अधिकार्‍यांना केवळ 2 टक्के लज्जास्पद व अपमानजनक पगारवाढ सुचवून बँक कर्मचारी व अधिकार्‍यांची एक प्रकारे थट्टा केली. बँक्स संघटनांनी त्याचा ताबडतोब निषेध नोंदवला व निदर्शने केली. परंतु आशावादी बँक संघटनांनी विश्वास ठेवून कोणतेही संघर्षाचे पाऊल उचलले नाही. तरीही आयबीएने आपली भूमिका ताठर ठेवून वेळकाढूपणा अवलंबविला व कोणत्याही परिस्थितीत मागण्याप्रमाणे वेतनवाढ देता येणार नाही असा सूर लावून धरला. त्यासाठी बँक ह्या तोट्यात असल्याची सबब पुढे रेटण्यात आली.

बँक कर्मचारी व अधिकार्‍यांची वेतनवाढ दर 5 वर्षांनी होत असून ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने मिळावी अशी अपेक्षा आहे. परंतु बायबीएने वाटाघाटीची केलेली सुरुवात ही अत्यंत हीन भावनेने केली असून वाटाघाटीसाठी कोणताही प्रतिसाद देत नसल्याने आज संपाचे शस्त्र उगारण्यासाठी भाग पडल्याचे नमूद करण्यात आले. सरकारने जर थकीत व बुडीत कर्ज वसुलीसाठी कडक कायदे करुन त्याची अंमलबजावणी केल्यास व बँकांना तसे अधिकार दिल्यास तसेच कर्ज बुडवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवून दोषींना गुन्हेगार ठरवून त्यांना पोलीस कोठडीत रवानगी केल्यास अशा कृत्यांना आळा बसेल असा विश्‍वास यावेळी कॉ. देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी कॉ. माणिक अडाणे, कॉ. सुनील उदरभरे यांची भाषणे झाली.




भाषणानंतर कर्मचारी व अधिकार्‍यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येवून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 1 फेब्रुवारी रोजी भारतीय स्टेट बँक लालटाकी या ठिकाणी निदर्शने आयोजित आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post