माणसे जोडण्याचे काम आपण करत आहात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची समाजसेवेची परंपरा आपण जोपासली. त्यांच्या संस्कारात लहानचे मोठे झालात म्हणूनच त्यांचे गुण आपल्या जीवनात पाहायला मिळतात. माणसे जोडण्याचे काम आपण करत आहात, असे कौतुकोद्गार काढत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ना.शंकरराव गडाख यांना मंत्री म्हणून उत्तम कामासाठी थेट पाठीवर हात ठेवत आशीर्वाद दिले आहेत.

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ना.गडाख आपले बंधू यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्यासह शुक्रवारी राळेगण येथे अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. सध्या मौन आंदोलन सुरू असल्याने अण्णांनी लेखी संदेश लिहून गडाख कुटुंबियांप्रती असलेला स्नेह आणि ना.शंकरराव यांच्यासाठी आशीर्वाद प्रकट केला. ना.शंकरराव व प्रशांत यांना उद्देशून लिहीलेल्या आपल्या लेखी संदेशात अण्णा हजारे म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची समाजसेवेची परंपरा आपण जोपासली. मंत्रीपदाची संधी हे त्याला लाभलेले फळ आहे, अशी माझी धारणा आहे. ईश्वराने आपल्याला दिलेला मनुष्य जन्म फक्त सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी नाही तर निष्काम भावनेने समाजाची सेवा करण्यासाठी आहे.

यशवंतरावजी यांनी आपल्या जीवनात हे दाखवून दिले आहे. राजकारण, समाजकारण किंवा धर्मकारण हे वेगळे नसते. फळाची अपेक्षा न करता केलेले कोणतेही कर्म ही ईश्वराची पूजा असते. यशवंतराव यांचे आचरण असेच आहे. शुध्द आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग हे गुण जीवनात असावे लागतात. काही वेळेला हे गुण असून सुद्धा काही लोक विरोध करतात, निंदा करतात, अपमानित करत असतात. त्यासाठी अपमान पचवण्याची शक्तीही असावी लागते. यशवंतरावजींच्या जीवनात हे पाहायला मिळते. अशा सर्वगुण संपन्न यशवंतरावजींच्या संस्कारात आपण लहानाचे मोठे झालात त्यामुळेच त्यांचे गुण आपल्या जीवनात पाहायला मिळतात.

सततचा संपर्क आला नसला तरी तुमच्या बद्दल वाचीत आलो, ऐकत आलो आहे. तुम्ही सत्ता आणि पैसा यासाठी काम करत नाहीत याची जाणीव आहे. कारण संतांनी म्हटले आहे, ‘सज्जनांचे माप चाले वार्‍याहाती’ निष्काम भावनेने केलेल्या कार्याची ही पावतीच आहे. त्यामुळे गाव, समाज, देशासाठी काम करता येईल. सत्तेमध्ये राहूनही बर्‍याच लोकांना करता येत नाही ते प्रशांत यांनी करून दाखवले आहे.
सत्तेच्या आधाराने मोठ मोठे रस्ते तयार करणे, पूल उभे करणे, धरणे बंधने, उंच उंच इमारती बंधने हे जनतेसाठी आवश्यक आहे. पण हे ज्या माणसांसाठी करायचे ती माणसे विकासापासून दूर जात असतील तर त्या कर्माला अर्थ रहात नाही.

माणसे जोडण्याची कामे करता ही सामाजिक दृष्टीने महत्वाची बाब आहे. भावंडांच्या या राम लक्ष्मणासारख्या जोडीला कोणाचीही दृष्ट न लागू नये, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पोपटरावांची गळाभेट
अण्णा हजारे यांनी गडाख बंधूंच्या पाठीवर हात ठेवत शुभेच्छा दिल्या. मी कुठल्याच पुढार्‍याच्या पाठीवर हात ठेवत नाही. परंतु तुमच्या पाठीवर हात ठेवत आहे, असेही अण्णासाहेब हजारे यांनी उपस्थितसमोर लिहून दिले. आदर्श हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे अनेक वर्षांपासून ना गडाख कुटुंबियाबरोबर सलोख्याचे संबंध असून त्यांनी ना.गडाख यांची गळाभेट घेतली.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या केंद्राच्या अखत्यारीत येतात. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा अगत्याचा मुद्दा आहे. महिलांवर अन्याय करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ना.शंकरराव गडाख यांनी यावेळी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post