नववर्ष दिनीच गॅस महागला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी (दि. 1) गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 19 रुपयांची वाढ केली आहे. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून नववर्ष स्वागताच्या जल्लोषात मग्न झालेल्या ग्राहकांची झिंग गॅस दरवाढीने उतरणार आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडर 19 रुपयांनी महागला आहे तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.

नगर शहरामध्ये 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर आता 721.50 रुपये झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना घरगुती गॅससाठी 19 रुपये जादा मोजावे लागतील. कारण मंगळवारपर्यंत गॅस सिलिंडर 702.50 रुपये होते. घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत 27 रुपयांची वाढ झाली आहे. 1239 रुपयांना मिळणारे सिलिंडर आता 1266 रुपये झाला आहे. या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांना दरवाढीची झळ सोसावी लागले. यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.

मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदल इंधन आयातीच्या खर्चात वाढ करतात. 2019 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात 2.28 टक्के अवमूल्यन झाले.

सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलिंडरवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो. स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देणार्‍या केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर गरिबांना मोठ्या संख्येने वितरित केले आहेत.

यामुळे मागील वर्षभरात एलपीजीचा खप 6 टक्क्याने वाढला असून तो 2.18 दशलक्ष टनांपर्यंत वाढला. नुकताच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 95 टक्के भारतीय कुटुंबाना गॅस सिलिंडर उपलब्ध होत असल्याचा दावा केला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post