रस्तेच भाड्याने देण्याचा घाट
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हॉस्पिटलच्या पार्किंग सुविधेसाठी 'पे अॅण्ड पार्क'च्या नावाखाली रस्तेच भाड्याने देण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. त्यासाठी ऑनलाईन निविदा न मागविता 'गुपचूप' ऑफलाईन निविदा मागविण्यात आल्या असून, अवघ्या ४ हजार रुपयांत पार्किंगसाठी रस्ता भाड्याने दिला जाणार आहे. या प्रकरणी सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे.
शहरातील साईदीप हॉस्पिटल व मॅक्सकेअर हॉस्पिटल लगत रस्त्यावर २० ते ३२ मीटर लांबीची जागा 'पे अॅण्ड पार्क'साठी भाड्याने दिली जाणार आहे. महापालिकेच्या मार्केट विभागाने यासाठी ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबविली आहे. साईदिप हॉस्पिटल लगतच्या रस्त्यासाठी ६ हजार रुपये प्रति महिना व मॅक्सकेअर हॉस्पिटल लगतच्या रस्त्यासाठी केवळ ४ हजार रुपये प्रति महिना दर प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्या प्रभागातील रस्त्यांवर 'पे अॅण्ड पार्क' होणार आहे, त्या प्रभागाच्या नगरसेवकांनाही यापासून अंधारात ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या नियमानुसार विकास योजनेतील मंजूर रस्ता व्यावसायिक वापरासाठी भाड्याने देता येत नाही. मनपाच्या नगररचना विभागानेच यापूर्वीच्या अशाच काही प्रस्तावांवर असे अभिप्राय नोंदविलेले आहेत.
साईदिप हॉस्पिटल परिसरात निवासी क्षेत्र आहे. रुग्णालयामुळे आधीच या भागातील नागरिक त्रस्त आहेत. यशवंत कॉलनीतील नागरिकांनी तर मोठी वाहने कॉलनीत येवू नयेत, यासाठी छोट्या कमानी उभारल्या आहेत. मॅक्सकेअर हॉस्पिटल लगतही रहिवासी परिसर असून, एका बाजूने कायम रहदारी असलेला मुख्य रस्ता आहे. विशेष म्हणजे, अवघे ४ व ६ हजार रुपये प्रतिमहा भाडे कोणत्या नियमानुसार ठरविण्यात आले? महापालिकेला 'पे अॅण्ड पार्क' सुरुच करायचे होते, तर ऑनलाईन निविदा का मागविण्यात आल्या नाहीत? असे सवालही शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.
Post a Comment