माय अहमदनगर वेब टीम
पॅरिस : जागतिक पातळीवर दहशतवादाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र; दहशतवादी कारवायांची व्याप्ती मोठी असून ती वाढतच आहे, अशा स्पष्ट शब्दांत दहशतवादासंदर्भातील एका अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यामध्ये होणा-या मृत्यूंचा आकडा २०१८मध्ये १५.२ टक्क्य़ांनी घटला आहे. मात्र, त्यावेळी दहशतवादाचा फटका बसलेल्या देशांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा ७१वर गेला आहे.
सिडनीस्थित ‘इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ (आयईपी) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘२०१९ ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ अहवालात ही बाब ठळकपणे समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्यांमुळे झालेली मनुष्यहानी सन २०१४च्या तुलनेत २०१८मध्ये निम्म्याहून कमी झाली आहे. २०१४मध्ये आयएस हा दहशतवादी गट मोठय़ा प्रमाणात सक्रिय असताना ३३ हजार ५५५ जणांनी दहशतवादी कारवायांमध्ये प्राण गमावले होते. २०१८मध्ये हा आकडा घटून मनुष्यहानी १५ हजार ९५२ वर आली आहे.
दहशतवादी हल्ल्यातील मनुष्यहानीचा विचार करता, २०१८मध्ये इराक आणि सोमालिया या देशांमध्ये मृत्यूचा आकडा सर्वाधिक घटला आहे. इराकच्या लष्कराने गेल्याच वर्षी आयएसवर विजय मिळवला, तर सोमालियामधील शबाब दहशतवाद्यांवर अमेरिकेच्या फौजांकडून २०१७ पासून सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या या यादीत २००३ पासून सातत्याने अग्रस्थानी असलेला इराक यंदा प्रथमच दुस-या स्थानी गेला आहे.
सन २०१८मध्ये दहशतवादामुळे सर्वाधिक मनुष्यहानी अफगाणिस्तानात झाली आहे. त्या देशात आयएसनंतर तालिबान्यांनी आपल्या कारवाया वाढवल्या असून, वर्षभरात एक हजार ४४३ दहशतवादी हल्ल्यांत सात हजार ३७९ लोकांनी प्राण गमावले आहेत.
पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका आणि ओशनियामध्ये कट्टर उजव्या गटांनी घडवून आणलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चिंताजनक वास्तव हे अहवालाने मांडले आहे. गेल्या पाच वर्षात उजव्या दहशतवादातील प्राणहानी ३२० टक्क्य़ांनी वाढली आहे. दहशतवादाची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या न्यूझीलंडमध्ये मार्चमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यात ५१ जणांचा मृत्यू, तसेच अमेरिकेत वंशद्वेषावर आधारित गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण ही याचीच उदाहरणे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
Post a Comment