महिनाभरात साखर कारखान्यांची प्रारूप मतदारयादी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांची निवडणूक रणधुमाळी मार्च आणि एप्रिल 2020मध्ये रंगणार आहे. यासाठी साखर सहसंचालक कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या वैयक्तिक सभासद आणि संस्था सभासदांची मतदारयादी मागवून तपासण्यात येत आहे. यातील संस्था मतदारांचा ठराव पाठविण्यासाठी साखर कारखान्यांना 18 डिसेंबरची मुदत देण्यात आली. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होणार्या कारखान्यांची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.
जिल्ह्यातील डॉ. विखे पाटील साखर कारखान्याची मुदत 6 मार्च, संगमनेरच्या थोरात साखर कारखान्याची मुदत 16 मार्च, सोनईच्या मुळा कारखान्याची मुदत 23 मार्च, वृध्देश्वर कारखान्यांची मुदत 27 मार्च, भेंड्याच्या ज्ञानेश्वर साखर कारखान्याची मुदत 27 मार्च, श्रीरामपूरच्या अशोक साखर कारखान्याची मुदत 20 एप्रिल, श्रीगोंद्याच्या नागवडे साखर कारखान्याची मुदत 20 एप्रिलला आणि कुकडी कारखान्याची मुदत 21 एप्रिला संपणार आहे. ही मुदत संपण्यापूर्वी या ठिकाणी निवडणूका घेवून नव्याने संचालक मंडळ नेमण्यात येणार आहे. त्यादृष्टीने निवडणूका घेण्याची तयारी साखर सहसंचालक कार्यालयाने सुरू केली आहे.
सध्या निवडणूका होणार्या कारखान्यांकडून सभासद यादी मागवून ती तपासण्यात येत आहे. यासह संस्था मतदारांचा ठराव पाठविण्यासाठी साखर कारखान्यांना 18 डिसेंबरची मुदत देण्यात आली. हे ठरव आल्यानंतर वैयक्तीक सभासद आणि संस्था सभासद यांची यादी तयार करून साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप मतदार यादी तयार करून त्यावर हरकती घेण्यात येणार आहे. त्यानंतर या यादीवर हरकती घेवून मतदार यादी अंतिम करून निवडणूक कार्यक्रम अंतिम करण्यात येणार आहे.
राजकीय डोके घालणार का?
जिल्ह्यातील सहकारातील राजकारण जानेवारीपासून गाजण्यास सुरूवात होणार आहे. निवडणूका होणार्या कारखान्यांमध्ये मंत्री बाळासाहेब थोरात, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ.शंकरराव गडाख, माजी आ.चंद्रशेखर घुले, आ. मोनिका राजळे, माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी आ.राहुल जगताप, राजेंद्र नागवडे या बड्या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एका कारखान्यांची निवडणूक संपल्यावर लागोपाठ ओळीने आणि एकाच वेळी अनेक कारखान्यांची निवडणूक होणार असल्याने हे नेते एक-दुसर्याच्या कारखान्यांच्या निवडणुकीत डोकं घालणार का? याकडे सहकारातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
Post a Comment