... तर उशीरा येणार्‍या शिक्षकांवर कारवाईचा बडगा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शाळेत उशीरा येणार्‍या शिक्षकांवर कारवाई केली जाईल असा इशाराच गटविकास अधिकारी संजय केदार यांनी देहरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिला. सरपंचानी या शाळेवर देखरेख ठेवावी. शिक्षक उशीरा आल्यास तात्काळ कळवा, लगेच कारवाई केली जाईल असे यावेळी सांगितले. यामुळे आता जिल्हा परिषद अंतर्गत असणार्‍या देहरे येथील सर्व कर्मचार्‍यांवर सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा वॉच असणार आहे.

देहरे (ता. नगर ) येथील जिल्हा परिषद मराठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी भेट दिली. जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. तसेच येथील शिक्षक नेहमीच उशीरा येत असल्याने शिक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली. जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला जावा, खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला जावा, यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवित असते. मात्र, येथील शिक्षक शाळेत वेळेवर येत नसल्याचे ग्रामस्थांनी केदार यांना सांगितले.

केदार यांनी शिक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली. सरपंच किसन धनवटे यांना शाळेवर लक्ष ठेवण्याचे सांगितले. उशीरा शिक्षक आल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा. तात्काळ त्या शिक्षकावर कार्यवाही केली जाईल असे सांगितले. शाळेतील पोषण आहार वाटप व्यवस्थीत होते की नाही, शाळेची पटसंख्या, गैरहजर प्रमाण, मुलांची शैक्षणिक प्रगती, टाचण वही, मुलांना काय शिकवले जाते. तसेच मुलांची गुणवता वाढविण्यासाठी काय करणार याबाबत विचारणा केली. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता रुग्णालयात असणार्‍या औषधांची पाहणी केली. अंगणवाडीमध्ये मुलांना देण्यात येणार्‍या आहारा बाबत चौकशी केली. ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असणार्‍या कामाची पाहणी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post