नवी दिल्ली - नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.५४% वर पोहोचला आहे. हा गेल्या ३ वर्षांतील सर्वाधिक आहे. यापेक्षा जास्त ६.०७% जुलै २०१६ मध्ये होता. ऑक्टोबरमध्ये हा ४.६२% राहिला होता. म्हणजे, सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मध्यम अवधी लक्ष्या(४%)पेक्षा अधिक राहिला. रिझर्व्ह बँक पतधोरण आढाव्यात व्याजदर निश्चित करतेवेळी किरकोळ महागाई दर ध्यानात घेते. या दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी आकडे जारी केले. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दरावर जास्त परिणाम झाला. खाद्य महागाई दर नोव्हेंबरमध्ये १०.०१% राहिला. ऑक्टोबरमध्ये ७.८९% आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये(-)२.६१% होता. यापेक्षा जास्त किरकोळ महागाई दर जुलै २०१६ मध्ये ६.०७ टक्के नोंदला होता.
सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महागाई दर ४ टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यास सांगितले आहे. त्यात २ टक्क्यांची वाढही आहे. आकडेवारीनुसार कांदा, टोमॅटो आणि अन्य भाज्यांच्या दरांत वाढ झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये महागाई दरात चांगली वाढ पाहावयास मिळाली. भाज्यांची महागाई नोव्हेंबरमध्ये वाढून ३६ टक्के झाली, जी एका महिन्याआधी २६ टक्के होती. नोव्हेंबरमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात खाण्यापिण्याच्या पदार्थांचे भाव १०.०१% पर्यंत वाढले आहेत. सीपीआयमध्ये अन्नाचा वाटा ४५.९% आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर १९.६ टक्के वाढले आहेत.
Post a Comment