6 धर्मियांना नागरिकत्व देणार त्याचे कौतुक नाही, मुस्लिम का नाहीत असे विचारले जाते -गृहमंत्री
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये 6-6 धर्माच्या लोकांना नागरिकत्व देण्याचा उल्लेख आहे. त्याचे कौतुक कुणी करत नाही आणि केवळ मुस्लिम का नाहीत असे विचारले जाते असे अमित शहा म्हणाले आहेत. राज्यसभेतविरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर एकानंतर एक सर्वांची उत्तरे देण्याचा प्रयत्न गृहमंत्री अमित शहा यांनी केला. विधेयकात पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या अल्पसंख्याकांचा विचार करण्यात आला आहे. या देशांमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत त्यामुळे, त्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नाही असे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी दिले. तुमची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केवळ मुस्लिम आणि आमची व्याख्या व्यापक आहे असेही ते पुढे म्हणाले.
देशातील मुस्लिमांनी कुणालाही घाबरू नये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यसभेत बुधवारी स्पष्ट केले. राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी त्यांनी सभागृहात सर्वांना यासंदर्भात खात्री करून दिली. काही लोक चुकीची माहिती देऊन भारतातील मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत असेही अमित शहा म्हणाले आहेत. दरम्यान, राज्यसभेत अमित शहा विधेयकाची प्रस्तावना मांडत असताना विरोधकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सभापतींच्या आदेशांवरूनराज्यसभेचे थेट प्रक्षेपण तात्पुरते थांबवण्यात आले होते.
नेमके काय म्हणाले अमित शहा ?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबद्दल देशातील मुस्लिमांमध्ये गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. मी त्यांना खात्री करून देऊ इच्छितो की ते भारतीय नागरिक आहेत आणि नेहमीच भारतीय राहतील. त्यांच्यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा भारतीय मुस्लिमांशी संबंध कसा असू शकतो असा सवाल देखील अमित शहांनी केला. यानंतर विधेयकावर बोलताना, शेजारील देशांमध्ये धार्मिक आधारावर ज्यांना यातना दिल्या जात आहेत त्याच लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. विरोधक यात मुस्लिमांसोबत भेदभाव होत आहे असे आरोप करत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारताचे नागरिकत्व कसे देता येईल अशा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.
Post a Comment