विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं ठिकाण शोधले असून, याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले आहे.


चांद्रयान २ जीएसएलव्ही मार्क ३ एम १ या प्रक्षेपकाच्या मदतीने २२ जुलै रोजी अवकाशात झेपावले होते. त्यानंतर कक्षाबदलाचे प्रयोग करीत ते १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. २० ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत गेले. त्यानंतर २ सप्टेंबरला लँडर विक्रम मूळ चांद्रयानापासून वेगळे झाले होते, नंतर त्याची कक्षा कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले होते. ७ सप्टेंबरला चांद्रभूमीवर उतरणे अपेक्षित होते. मात्र, १५ मिनिटांच्या शेवटच्या थरारक टप्प्यावर अचानक लँडरचा संपर्क तुटल्याने ही मोहीम अपयशी ठरली.

त्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर दोन महिन्यानंतर चांद्रयानासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यानं विक्रमच्या अवशेषाचे फोटो टिपले आहेत. भारतीय कम्प्युटर प्रोग्रामर आणि मेकॅनिकल इंजिअर शनमुगा सुब्रमणियम यांनी नासाशी संपर्क साधला होता. त्यानंतर नासानं विक्रम लँडरचे अवशेष सापडले असल्याची माहिती दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post