राम शिंदेंचा आ. विखेंवर हल्लाबोल ; म्हणाले भाजपाच्या पराभवास हेच जबाबदार!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या पराभवाला राधाकृष्ण विखे हेच कारणीभूत असल्याचे टीकास्त्र माजी मंत्री नामदार राम शिंदे यांनी सोडले असून विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षात खोड्या करतात असाही आरोप शिंदे यांनी केला आहे. महाराष्ट्रात आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत जागांवरील पराभवाची तपासणी करण्याचे काम सुरू असून उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माजी मंत्री शिंदे यांनी बोलताना राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली व त्याला पराभूत आमदार शिवाजी कर्डीले व स्नेहलता कोल्हे यांनीही दुजोरा दिला आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांनी पुढे बोलताना जिल्ह्यातील सर्वच जागांवरील पराभवाची कारणमीमांसा मांडली. अहमदनगर जिल्ह्यात भाजपाचे ५ आमदार असताना आणि स्वतः विखे व पिचड हे आमदार पक्षात घेतल्यानंतर ७ आमदार जिल्ह्यात होते. तरीही फक्त ३ आमदार निवडून आल्याने शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वतः राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे जिल्ह्यात १२-० असे भाजपाच्या बाजूने चित्र असेल असे सांगत होते पण प्रत्यक्षात जिल्ह्यातील भाजपा संपविण्याचा घाट विखेंनी घातला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे, त्याला उर्वरित उपस्थित आमदारांनी पण शिंदे बोलतात असेच असल्याचे सांगितले असल्याने आता भाजपात अंतर्गत बंडाळी निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत असून या वादाचा पुढील महिन्यात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणुकीत परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.
Post a Comment