शिक्षक समाजाचा व देशाचा पाया - उपमहापौर ढोणे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांना महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. तर सेवानिवृत्त शिक्षक व आयएसओ मानांकन मिळवणार्‍या शाळेच्या मुख्यध्यापकांसह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
माऊली संकुल सभागृहात झालेल्या शिक्षकांच्या गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर मालनताई ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णा गेनाप्पा, नगरसेवक मनोज कोतकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, डी.आर. कुलकर्णी, वसंत म्हस्के, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, सचिव विठ्ठल उरमुडे, शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे, अरविंद गोरेगावकर आदींसह शालेय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समर्थ विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनान कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी सुभाष पवार यांनी समाज घडविण्याचे कार्य करणार्‍या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा झाला पाहिजे. या उद्देशाने महापालिका शिक्षण विभागाने शंभर खाजगी तर बारा महापालिकांच्या शाळांमधून उत्कृष्ट शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे सांगितले. तर पुरस्कार्थी निवडतानाचे निकष स्पष्ट केले.
उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या की, आयएसओ मानांकन मिळवून महापालिकेच्या शाळा आपली गुणवत्ता सिध्द करीत आहे. समाजाचा व देशाचा पाया शिक्षक आहे. शिक्षक युवकांना दिशा देण्याचे कार्य करतात. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मीना पवार (बाई इचरजबाई फिरोदिया), योजना जपे (समर्थ विद्या मंदिर), सुनिता शेवाळे (महाराष्ट्र बालक मंदिर), निलोफर पठाण (मनपा शाळा क्र.17), शेखर उंडे (पंचशील विद्या मंदिर) या पाच शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.अमोल बागुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर सेवानिवृत्त शिक्षकांसह आयएसओ मानांकन प्राप्त करणारे ओंकारनगर मनपा शाळा क्र.2, रिमांड होम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा क्र.4 या शालेय शिक्षकांचा सत्कार झाला. पुरस्कार प्राप्त उंडे सर व पवार मॅडमने सत्काराला उत्तर देऊन पुरस्काराने कार्य करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ.अमोल बागुल यांनी राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराबद्दलची माहिती देऊन या पुरस्कारासाठी फाईल बनविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलप्रसाद तिवारी व अस्मिता शूळ यांनी केले. आभार मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post