स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी 21 मुली भारतभ्रमंतीवर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्त्री शिक्षणाचे महत्त्व, मुलगी वाचवा... मुलगी शिकवा व स्वच्छ भारतचा संदेश घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंन्त सायकल रॅलीने निघालेल्या मुलींच्या सायकलोथॉनचे सोमवारी संध्याकाळी नगरमध्ये आगमन झाले. मार्केटयार्ड, महात्मा फुले चौकातील राजनंद हॉटेल येथे नगरकरांच्या वतीने नगरसेविका शीतल जगताप यांनी या मुलींच्या सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, महेश दरेकर, दादा घालमे, गोरक्ष गोरे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव ढाकणे, क्रीडा संचालक संजय पाटील, डॉ.विनोद झालटे, प्रा.निलेश म्हात्रे, जयवंत चव्हाण, विजय गुरव, गुलाब राजपूत, रोहन वैद्य आदी उपस्थित होते.
घाटकोपर (मुंबई) येथील श्रीमती पी.एन. दोशी महिला महाविद्यालयाच्या 21 धाडसी मुली काश्मीर ते कन्याकुमारी असा 3700 कि.मी. चा प्रवास करीत आहेत. काश्मीर पासून 20 नोव्हेंबर रोजी सुरु झालेला हा प्रवासाची सांगता 25 डिसेंबरला कन्याकुमारी येथे होणार आहे. तब्बल 35 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. 8 राज्यातून ही सायकल रॅली जाणार आहे. पी.एन. दोशी महिला महाविद्यालयास 60 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल हिरकमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना ही सायकल रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीसह क्रीडा संचालक, शालेय शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी आहेत.
आज समाजात मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र आज या मुलींना पाहून त्यांच्या धाडसाचे व महिला कर्तृत्वाचा अभिमान वाटत असल्याची भावना शितल जगताप यांनी व्यक्त केली. स्त्री शिक्षण ही काळाची गरज बनली असून, सर्वच क्षेत्रात मुली आपले कर्तृत्व गाजवीत आहेत. महिला शक्तीचा हा जागर असून, या रॅलीतून तीच्या कर्तृत्वला झळाली मिळाली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले. उपस्थितांनी सायकल रॅलीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने रॅलीत सहभागी मुलींसह शिक्षकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सायकलपटू युवतींनी मुलगी वाचवा... मुलगी शिकवा या विषयावर नाट्याचे सादरीकरण केले. यावेळी महाविद्यालयीन युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रॅलीत सहभागी मुलींनी नगरकरांनी केलेल्या स्वागताने भारावले असल्याची भावना व्यक्त केली.