माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : एसपींच्या बंगल्यावर ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला डीवायएसपी अजित पाटील आणि त्यांच्या गाडीवरील चालकाने विनाकारण मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.3) संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई सागर भास्कर तावरे (वय-28) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक अजित पाटील आणि त्यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिवसभर हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यास यश आले नाही. शेवटी डीवायएसपी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर हकीगत अशी की, फिर्यादी पोलीस शिपाई सागर तावरे हे अहमदनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तावरे हे मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या गेटजवळ मित्रासोबत बोलत उभे होते. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे त्या ठिकाणी आले. त्यांनी काहीही चौकशी न करता तावरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत या ठिकाणी गर्दी झाली होती. तावरे यांनी मी पोलीस आहे, अधीक्षक साहेबांच्या बंगल्यावर असतो असे सांगितले. तरी देखील पोलीस उपअधीक्षकांनी तावरे यांना मारहाण केली. तसेच तावरे यांना दुचाकीवरून खाली पाडले. अजित पाटील यांच्या चालकाने तावरे यांना उभा करून दोन्ही हात पकडून ठेवले. त्यानंतर अजित पाटील यांनी तावरे यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.
या प्रकारानंतर तावरे यांनी पोलीस अधीक्षकांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. दरम्यान या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तावरे यांना हे प्रकरण वाढवू नये यासाठी प्रयत्न केले. मंगळवारी रात्री उशीरापर्य़ंत गुन्हा दाखल झाला नाही. अखेर पोलीस शिपाई तावरे यांनी तक्रार देण्याचा निर्णय घेत पोलीस उपअधीक्षक अजित पवार आणि त्यांच्या चालकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहेत.
Post a Comment