महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनात भाजपात मोठा भूकंप ?




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होण्याचा इतिहास आहे, त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे, असे भाकित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वर्तविले. भाजपमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले असून, पंकजा मुंडे-पालवे यांनीही नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत आपला स्वतंत्र जनाधार निर्माण करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
पक्षांतर्गत निर्माण झालेले मतभेद पाहाता, भाजपच्या कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत काल रात्री उशिरा पार पडल्याची माहिती भाजप सूत्राने दिली. या बैठकीत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील रणनीती व पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांच्या आरोपांमुळे निर्माण झालेले डॅमेज कसे कंट्रोल करायचे यावर विचारमंथन झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वृत्तवाहिन्यांशी बोलताना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले, की मागील काही वर्षामध्ये राज्यात ओबीसींची अनेक आंदोलने झाली. ओबीसींचे अनेक प्रश्न मांडण्यात आले, पण त्यांना फडणवीस सरकारने न्याय दिला नाही. विधानसभा निवडणुकीतही ओबीसी नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी टार्गेट केले. त्यांना तिकीट देण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना पराभूतही करण्यात आले, त्यामुळेच भाजपमधील खदखद बाहेर पडत आहे. नागपूर अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर भाजपमध्ये भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये खदखद आहे. पक्षावर दिग्गज नेते नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. जे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेले ते आमदारदेखील आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post