जामीनदार न झाल्याने आतेभावाचा खून : आरोपीस जन्मठेप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : जेलमध्ये असताना जामीनदार झाला नाही. याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे, रा.वडुले बु. काळे वस्ती ता.शेवगाव याने त्याचा आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे याचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री.अशोककुमार भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याला भा.द.वि. ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ॲड.सतिश कि.पाटील यांनी काम पाहिले.
या खटल्याची माहिती अशी की, सन ऑगस्ट २०१८ मध्ये आरोपी ज्ञानेश्वर काळे याने वडिल चंद्रकांत भिमाजी काळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या डाव्या हाताला चावा घेवून त्यांच्या बोटाची कांडी तोडली होती. त्यामुळे वडिलांनी आरोपीविरूध्द फिर्याद दिल्याने शेवगाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर याला अटक केली होती. तो शेवगाव जेलमध्ये असताना मयत संदिप व फिर्यादी वडिल त्याला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर मयत संदीपला म्हणाला, तु मला जामीनदार हो,त्यास संदिपने नकार दिला.याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर याने दि.२९/१२/२०१८ रोजी सायं.७:३० वा.चे सुमारास आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे यास त्याचे मोबाईलवर शिवीगाळ केली.यावेळी साक्षीदार व मयत संदिप हे आरोपी ज्ञानेश्वरच्या घरी गेले असता त्याने त्यांना शिवीगाळ करून मयत संदिप व त्याचा भाऊ बापु यांना पाठीवर चावा घेतला व खिशातील चाकूने मयत संदिप याचे छातीवर वार करून गंभीर जखमी केले.जखमीला उपचारार्थ शेवगावच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
याबाबत मयत संदिप याचा चुलत भाऊ अमोल भाऊसाहेब जर्गे याने शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द भा.द.वि.कलम ३०२, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. नितीन अशोक मगर यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्र.२, अशोककुमार भिल्लारे यांचेसमोर झाली. यावेळी सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल जर्गे, बाबासाहेब जर्गे,वैद्यकिय अधिकारी डी.एच. परदेशी, पंच पांडुरंग ढाकणे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाने सादर केलेला भक्कम पुरावा व युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वर काळे याला भा.द.वि.का.क. ३०२ नुसार दोषी धरून जन्मठेप व १०,००० रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास. तसेच भा.द.वि.का.क. ३२३ नुसार ३ महिने सक्तमजुरी व १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील ॲड.सतिश किसनराव पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी थोरात यांनी सहाय्य केले.
Post a Comment