माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर येत्या एक डिसेंबरपासून रोख रक्कम देऊन टोल भरण्याऐवजी फास्टॅग प्रणालीद्वारे टोल भरणा करावा लागणार आहे. त्यामुळे टोलनाक्यावर वाहनांना जास्त वेळ रांगेत थांबण्याची गरज उरणार नसल्याने वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अहमदनगर प्रकल्प संचालक प्र. भा. दिवाण यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगची व्यवस्था करण्यात आली आहे. या लेनमध्ये गाडी येताच गाडीच्या काचेवर चिकटवण्यात आलेले फास्टॅगचे स्टीकर टोल नाक्यावर बसवलेल्या स्कॅनरद्वारे स्कॅन केले जाईल. त्या गाडीची टोलची रक्कम संबंधित फास्टॅगशी लिंक असणार्या बॅंकेच्या खात्यातून वसूल केली जाईल. त्यानंतर त्वरित स्वयंचलित बूम बॅरिअर उघडले जाईल आणि गाडी मार्गस्थ होईल. या प्रक्रियेस अत्यंत कमी वेळ लागणार असल्याने वाहनचालकांच्या वेळ आणि इंधनात बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एनएच-61 (जुना 222) वरील ढोकी टोल नाक्यावर 3+3 फास्टॅग लेन अनिवार्य करण्यात येणार आहेत आणि रोख भरणा करण्यासाठी केवळ एकच लेनची सुविधा यापुढे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी एक डिसेंबरपूर्वी त्यांच्या वाहनांवर फास्टॅग स्टीकर लावावेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर, बॅंकांमध्ये फास्टॅग स्टीकर मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवर माय फास्टॅग नावाचे अॅप देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या बॅंक खात्याशी जोडले जाऊन टोल नाक्यावरुन वाहन गेल्यानंतर टोलची रक्कम बॅंक खात्यातून वजा होईल व हे स्टीकर रिचार्ज करुन घ्यावे लागेल. याशिवाय, जिल्ह्याकील कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे-नाशिक (संगमनेर तालुका) या दोन महामार्गावरील टोलनाक्यांवर 1 डिसेंबर, 2019 पासून फास्टॅग प्रणालीचा वापर करणे अनिवार्य असणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Post a Comment