सुप्रीम कोर्टात आपल्या आमदारांचे शपथपत्र सोपवण्यच्या तयारीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस



माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्ता स्थापना आणि बहुमत सिद्ध करण्याबाबत सुरू असलेल्या महाभारतावर रविवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सादर करण्यात आलेल्या युक्तीवादावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी उत्साही आहेत. तिन्ही पक्ष लवकरात-लवकर बहुमत चाचणी घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊ इच्छित आहेत. त्यामुळेच, तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांसह अपक्ष आमदारांचे सुद्धा शपथपत्र सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सादर करण्याची तयारी केली आहे.

कोर्टात या पक्षांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि डॉ अभिषेक मनु सिंघवी यांच्या टीमने शपथपत्र गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. टीमशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 150 पेक्षा अधिक आमदारांचे शपथपत्र घेण्याची तयारी आहे. जेणेकरून लवकरात-लवकर फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी मजबूत करता येईल. सोबतच, कोर्टाला सुद्धा आदेश देताना काही तांत्रिक अडचणी येणार नाहीत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे काम रविवारीच सुरू करण्यात आले आहे. सर्वच शपथपत्र रविवार रात्री दिल्लीत पोहोचतील. बहुमत चाचणीशी संबंधित वादात याचिकाकर्त्यांकडून आमदारांचे शपथपत्र कोर्टात सादर करण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.

सुप्रीम कोर्टात रविवारी झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार आणि भाजपचे दावे खोटे ठरवण्यासाठी काँग्रेसच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 आमदारांचे हमीपत्र सुप्रीम कोर्टात दाखल केले होते. याच दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे एकमेकांच्या संपर्कात आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आप-आपले आमदार वेग-वेगळ्या हॉटेलांमध्ये सुरक्षित ठेवले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post