आरोग्याच्या सामान्य समस्या दूर ठेवेल पुदिना



माय नगर वेब टीम
हेल्थ डेस्क - बदलत्या वातावरणानुसार आरोग्याच्या समस्या, अपचन, त्वचेच्या समस्या अशा अनेक सर्वसामान्य समस्या आपल्याला उद्भवत असतात. आरोग्याच्या अशाच छोट्या छोट्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी पुदिन्याचे सेवन करायला हवे. अनेक खाद्यपदार्थांमध्ये तसेच गानिर्शिंगसाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना म्हणजे तुळशीप्रमाणे एक औषधी वनस्पती. पुदिन्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

साधी सर्दी : पुदिन्यामध्ये मेंथॉल असतो, जो सर्दीवर नैसर्गिक उपचार देतो. मेंथॉल थंडपणा देतो त्यामुळे घसा खवखवत असेल तर त्यापासूनही आराम मिळतो. सर्दी झाली असल्यास पुदिन्याची पानं घातलेला चहा प्यावा.

अपचन : पोटासंबंधी काही समस्या असल्यास त्यावर पूर्वीपासूनच औषध म्हणून पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिन्यामुळे पित्त नियंत्रणात राहते, पचन प्रक्रिया सुरळीत होते. गॅस झाला असेल, मळमळ जाणवत असेल अशा वेळी त्यावर पुदिना फायदेशीर ठरतो.


अॅलर्जी : पुदिन्यामध्ये रोस्मॅरिनिक अॅसिड हा अँटिऑक्सिडंट आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटक असतो. वातावरणानुसार होणाऱ्या अॅलर्जीपासून हा घटक आराम देतो.

वेदना : शरीराच्या ज्या भागावर वेदना होत आहेत त्यावर पुदिन्याचा पानांचा रस बाहेरून जरी लावला तरी वेदनांपासून पुरेसा आराम मिळतो. याशिवाय चहामध्ये पुदिन्याची पानं टाकून अशा चहाचे सेवन करावे.

त्वचा : त्वचेवर रॅश आले असतील, छोटा कीटक चावल्याने जळजळ होत असेल किंवा इतर त्वचेच्या समस्येवर पुदिन्याची पेस्ट लावल्यास जळजळीपासून आराम मिळतो, पुदिना त्वचेला थंडावा देतो.

तोंड : पुदिन्यामध्ये नैसर्गिक अँटिमायक्रोबिअल घटक असतात, ज्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते, तोंडाचे आरोग्य चांगले राहते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post