अहमदनगर : सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी ईश्वर अशोक बोरा तर व्हाईस चेअरमनपदी किरण धोंडीराम शिंगी यांची एकमताने निवड झाली आहे. संस्थेच्या मार्केटयार्ड शाखेत नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथील कार्यालयीन अधीक्षक किरण आव्हाड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत चेअरमनपदासाठी बोरा यांच्या नावाची सूचना मावळते चेअरमन मनोज गुंदेचा यांनी मांडली. त्यास लता कांबळे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी किरणी शिंगी यांच्या नावाची सूचना सुवर्णा डागा यांनी मांडली, त्यास विनय भांड यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक समीर बोरा, संतोष गांधी, शेलेश गांधी, अभय पितळे, राखी मुनोत, पंडीतराव खरपुडे, विशाल गांधी, संस्थेचे सभासद व मार्गदर्शक राजेंद्र चोपडा, अजित बोरा, प्रमोद गांधी, व्यवस्थापक प्रशांत भंडारी, मार्केटयार्डचे शाखाधिकारी मनोज लुणिया यांच्यासह सभासद, संचालकांचा मित्र परिवार, कर्जदार, ठेवीदार, ग्राहक उपस्थित होते. या निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड व नूतन पदाधिकार्यांचा उपस्थितांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
नूतन चेअरमन ईश्वर बोरा म्हणाले की, सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी स्थापन केलेल्या, उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची परंपरा असलेल्या संस्थेच्या चेअरमनपदी निवड होणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान आहे. पदाच्या माध्यमातून संस्थेची आर्थिक घोडदौड कायम राखताना संस्थेला आणखी उत्कर्षाकडे नेण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्वांना सोबत घेवून, सभासद, संस्था हिताचा कारभार करणार आहे. संस्थेने घेतलेल्या नवीन जागेत देखणी वास्तू उभारणीचे काम चालू असून लवकरच संस्था या नव्या जागेत स्थलांतरीत होईल. संस्थेकडे आजमितीस 45 कोटींच्या ठेवी असून 33 कोटींचे कर्जवाटप आहे. भविष्यात ठेवी 100 कोटीपर्यंत नेतानाच संस्थेचे बँकेत रुपांतर करण्याचा प्रयत्न असेल. आदरणीय सुवालालजी गुंदेचा यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार अतिशय सचोटीचा व पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
नूतन व्हाईस चेअरमन किरण शिंगी म्हणाले की, संस्थेला सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या आदर्श विचारांची, शिस्तबध्द कारभाराची परंपरा आहे. या परंपरेचे तंतोतंत पालन करताना आधुनिक युगातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक बँकिंग सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. याकामी सर्व संचालकांच्या विचारविनिमयातून एकत्रितपणे निर्णय घेण्यात येतील. भविष्यात संस्थेचा नावलौकिक आणखी वृध्दींगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मावळते चेअरमन मनोज गुंदेचा म्हणाले की, दोन वर्षे या प्रतिष्ठित संस्थेचे चेअरमनपद भूषविण्याची संधी मला मिळाली. या काळात अनेक चांगल्या योजना राबवून सभासद हित साधता आले. याकामी सर्व संचालकांचे, अधिकारी, कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. थकीत कर्जासाठी विशेष प्रयत्न करून वसुलीला वेग दिला. संस्थेच्या ठेवींमध्ये भरघोस वाढ झाली. अत्याधुनिक सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. हिच परंपरा नूतन पदाधिकारी पुढे चालवतील व त्यांना याकामी सर्व संचालक पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही देत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
Post a Comment