अहमदनगर - अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये किशोरवयातील मुला-मुलींसाठी कळी उमलताना व वयात येताना या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानास शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. डॉ.अंशू मुळे यांनी कळी उमलताना मुलींसाठी तर डॉ.महेश मुळे यांनी वयात येताना मुलांसाठी विषयावर मार्गदर्शन केले. या व्याख्यानात त्यांनी शारीरिक व मानसिक बदलाचे रहस्य उलडून घ्यावयाची काळजी तसेच उत्तम आरोग्य व मानसिक स्वास्थ्या संदर्भात मार्गदर्शन केले.
डॉ.अंशू मुळे कळी उमलताना या विषयावर बोलताना म्हणाल्या की, वयात येणार्या मुलींना लैंगिक विषयाची माहिती देणे अत्यावश्यक आहे. प्रामुख्याने मासिक पाळीच्या वेळी मुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने होत असतात. मुलींनी समाजात वावरताना धाडसी वृत्तीने वागावे. स्वसंरक्षणासाठी मुलींनी कराटे व इतर खेळाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून, तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे. या विषयाची जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगून, त्यांनी उत्तम आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार पध्दती व व्यायामाचे महत्त्व विशद केले. डॉ.महेश मुळे यांनी वयात येताना या विषयावर मार्गदर्शन करताना वाईट मार्गापासून परावृत्त होण्यासाठी अधिकाधिक वाचन करुन ज्ञानात वाढ करावी. पुस्तक देखील आयुष्यात उत्तम मार्गदर्शक ठरतात. आपले पालक व शिक्षक वर्ग यांच्याबरोबर निसंकोचपणे संवाद ठेवण्याचे सांगत, तणाव दूर करण्यासाठी एखादा छंद जोपासण्याचा सल्ला दिला. पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड यांनी केले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी धावत्या युगात पालकांना आपल्या मुला-मुलींकडे लक्ष देण्यास कमी वेळ मिळत असल्याने असे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अर्चना मुंडीवाले यांनी केले. आभार वर्षा खेडकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विभाग प्रमुख व शालेय शिक्षक उपस्थित होते.
Post a Comment