पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम विकणार, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची माहिती
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - कर्जात बुडालेल्या दोन कंपन्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशनला सरकार पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. सितारामन म्हणाल्या की, या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील वर्षात या कंपन्यांची विक्री होईल. सरकारवर सध्या 57 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
सध्या एअर इंडिया खरेदी करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. मागील वर्षी कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून तोट्यात असलेल्या एअर इंडियाची विक्री थांबवावी लागली होती. या कंपनीकडून कर वसुलीचा दबाव असल्याने सरकार निर्गुंतवणूक, धोरणात्मक विक्री तसेच सार्वजनिक ऑफर्सद्वारे महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना खुले पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, कंपनीचे विभाजन कंपनीला अधिक सक्षम बनवेल. मागील वर्षी सरकारने विमान कंपनीतून 76 टक्के हिस्सा विक्रीसाठी काढला होता. मात्र, कोणीही कंपनी विकत घ्यायला तयार नव्हती. सध्या सरकारकडे एअर इंडियाचे 100 टक्के समभाग आहेत.
Post a Comment