शहरातील बाजारपेठेतील अतिक्रमणे पुन्हा ’जैसे थे’



माय नगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. त्यामुळे 3-4 दिवस शहरातील बाजार पेठेने मोकळा श्वास घेतला. मात्र आता पुन्हा बाजार पेठेतील अतिक्रमणे पुन्हा ’जैसे थे’ झाली असल्याचे चित्र मंगळवारी (दि.19) दिसून आले.

शहरात अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या अतिक्रमणांमुळे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरून पायी चालणेही नागरिकांना अडचणीचे होत आहे. या अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई केल्यानंतरही अतिक्रमणधारक पुन्हा आपल्या टपर्‍या, हातगाड्या, दुकाने थाटून तसेच दुचाकी चारचाकी वाहने लावून रहदारीला अडथळा आणत आहेत. मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मागील आठवड्याच्या सुरवातीपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. शहर परिसरातील अतिक्रमणांवर सलग 3-4 दिवस कारवाई केल्यानंतर या पथकाने सोमवारी (दि.18) आपला मोर्चा सावेडी उपनगरात वळवला. त्यामुळे शहरातील अतिक्रमणे पुन्हा आपल्या जागेवर आली आहेत.

अतिक्रमण विरोधी पथकाने पोलिसांची मदत घेत अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. रहदारीला अडथळा ठ़रणार्‍या गाड्या, हातगाड्या टपर्‍या आणि फळ विक्रीच्या गाड्या आणि साहित्य पथकाने जप्त केले. ही मोहिम सुरू झाल्यानंतर बाजारपेठेतील अतिक्रमण धारकांची धावपळ उडाली होती.

तथापि पथक पुढे निघून गेल्यानंतर दुपारी सदरची अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली. अतिक्रमण धारकांनी पुन्हा आपल्या गाड्या रस्त्याच्या बाजूने, दुकानांसमोर आणून उभ्या केल्या. सर्वच अतिक्रमणे पुन्हा आपल्या जागी उभी राहिल्याने प्रशासनाची अतिक्रमणांवरील कारवाई म्हणजे ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ असेच म्हणावे लागेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post