पिकपमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा 'तो' आरोपी गजाआड


माय नगर वेब टीम
अहमदनगर -

शहरातील स्टेशन रोडवरील क्लेराब्रुस हायस्कूल परिसरात तरुणीवर पिकअप टेम्पोत अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून टेम्पो चालक गणेश शहादेव बडे(वय १९ रा. चिंचपूर, ता. पाथर्डी) यास अटक केली आहे. या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढविण्यात आले असून, हा तपास पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील २१ वर्षीय तरूणी नोकरीनिमित्त दररोज नगर शहरात येते. मंगळवारी (दि.१९) सायंकाळी ती आईसोबत नगर-जामखेड रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबली होती. त्या दरम्यान, जामखेडकडून नगरकडे येताना तिने एका पिकअप वाहनचालकाला हात केला. सदर वाहनचालकाने गाडी थांबवली. आईला निरोप देऊन ही तरूणी या वाहनात बसली. गाडीत या दोघांशिवाय कोणीच नव्हते. हिच संधी साधून या वाहनचालकाने नगरजवळ आल्यानंतर क्लेरा ब्रुस मैदानाजवळ गाडी थांबवली. गाडीचे दरवाजे, काचा बंद करून जबरदस्तीने या तरूणीवर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून वाहन घेऊन पळून गेला. तरूणीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्याद दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे यांनी पथकासह आरोपीचा शोध घेतला. तेव्हा आरोपी हा पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेला पिकअप टेम्पो जप्त केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post