स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी
माय नगर वेब टीम
एका वर्षाच्या आत मध देऊ नये. मधामुळे पोट बिघडण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. लहान वयातच बालिकेला संपूर्ण आहाराची सवय लावावी. कारण या वयातच नकळतच जिभेला लागलेली चव आयुष्यभर आवडते. एक-दोन वर्षाच्या बालिकेला पोळी-भाजी, वरण-भात, त्यावर साजूक तूप असा आहार द्यावा.
शाळेतील बालिकेचा आहार : तीन ते नऊ वर्षे वयांतील मुलींची शारीरिक व मानसिक वाढ झपाट्याने होते, म्हणून रोज रात्री दोन बदाम, दोन खारीक, चार-पाच काळे मनुके भिजत घालावेत व सकाळी उठल्यावर खाण्यास द्यावेत. यामुळे तिच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण चांगले राहील व पोट साफ होईल.
या काळात प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्सनी युक्त समतोल आहार द्यावा. पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्य, दूध, साजूक तूप, ताक, ऋतूंमधील फळे, राजगिरा, गूळशेंगदाण्याचे, नाचणीचे लाडू इत्यादींचा आहारात समावेश करावा. मुलींना रोजरोज भाजी-पोळी खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या उदाहरणार्थ, लाल माठ, पालक, मेथी, राजगिरा, तांदुळजा यांचे विविध सकस व स्वादिष्ट पदार्थ द्यावेत. मांसाहार असल्यास उकडलेले अंडे, मासे, चिकन आठवड्यातून दोनदा द्यावे. या सर्व पदार्थांमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले राहते.
अभ्यंग : बालिकेच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी पहिली दोन वर्षे रोज तेलाचा अभ्यंग करावा. त्यामुळे शारीरिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व स्नायू बळकट होतात. याकरिता आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले बलायुक्त तेल वापरावे. त्यानंतर वयाच्या नऊ वर्षांपर्यत आठवड्यांतून एकदा सुट्टीच्या दिवशी अभ्यंग करून स्नान घालावे. अभ्यंग स्वत: आईने किंवा जाणकार व्यक्तीने करावा.
स्नान : बालिकेला सोसेल अशा कोमट पाण्याने स्नान घालावे. जुन्या काळातील काही स्त्रिया अंघोळीच्या वेळी बालिकेचे स्तन पिळतात. स्तन पिळल्याने गाठी होणे, पू तयार होणे या समस्या उद्भवू शकतात. यामुळे जंतुसंसर्ग होऊन थंडी, ताप येऊ शकतो. त्यामुळे लहान बालिकेचे स्तन कधीच पिळू नयेत. त्यामधून पातळसर पांढरा द्रवपदार्थ बाहेर येत असला, तरी ते बालिकेच्या शरीरातील संप्रेरके (हार्मोन्स) कमी होत असल्याचे द्योतक असते. यासाठी कुठलाही उपाय करण्याची गरज नाही. काही दिवसांनंतर ते आपोआप कमी होते. जन्मत:च काही बालिकांना योनिमार्गाद्वारे पाळीसारखे रक्त जाणे नैसर्गिकच असते. शरीरातील संप्रेरके कमी-जास्त होण्यामुळे हे घडते.
Post a Comment