भाजप स्वबळावर सत्ता स्थापण्याच्या तयारीत...
माय नगर वेब टीम
मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा हट्ट शिवसेनेने कायम ठेवल्यास भाजप २०१४ प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर सरकार स्थापन करेल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. ३० अाॅक्टाेबर राेजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येत असून या वेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची औपचारिकताही पूर्ण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप एकटे सरकार कसे स्थापन करते ते पाहू, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला अाहे. त्यामुळे महायुतीतल्या या दोन प्रमुख पक्षांमधील संघर्ष विकोपाला गेल्याचे सांगण्यात येते. सत्ता स्थापनेसाठी काय काय घडामोडी घडतात ते पाहणे गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. परंतु दोन्ही पक्षांमध्ये समसमान अधिकारांचे सूत्र युती करण्याआधी ठरल्यामुळे पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. भाजपला ही अट मान्य नाही. शिवसेनेने अन्यथा इतर पर्यायांचा विचार करण्याचा इशारा दिला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षातच बसण्याचे जाहीर केल्यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली आहे. अशा स्थितीत अपक्ष तसेच इतर लहान पक्षांच्या २० सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालेल्या फडणवीस यांनी गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेशिवाय सत्तास्थापनेच्या रणनीतीवर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. २०१४ मध्ये १२२ संख्याबळ असलेल्या भाजपने आधी सरकार स्थापन केले. त्यानंतर आपल्या शर्तींवर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. त्याचप्रमाणे आताही तसे प्रयत्न चालू आहेत.
३० ऑक्टोबरला अमित शहा मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक घेणार अाहेत. त्यात भाजपच्या विधिमंडळ नेत्याची औपचारिक निवड केली जाईल. या वेळी शहा उपस्थित राहतील. त्यानंतर भाजपचे हे नेते सर्वात मोठा पक्ष या नात्याने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करतील, असे कळते.
याच दिवशी ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत असतील. त्यामध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन करतील अथवा ती एक औपचारिकता ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.

Post a Comment