विधानसभेसाठी इतके आहे डिपॉझिट ; अर्ज भरण्यास सुरुवात


माय नगर वेब टीम

अहमदनगर - आजपासून (२७ सप्टेंबर) विधानसभा निवडणुकीकरीता इच्छुक व्यक्तींना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे चौथा शनिवार तसेच गांधी जयंतीच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करता येणार नाहीत. उमेदवारी अर्ज सर्व तहसील कार्यालय येथे उपलब्ध आहेत. दरम्यान उमेदवारी अर्जासोबत १०,००० हजार रुपये अनामत रक्कम रोख अथवा विहित स्वरूपात चलनाने भरता येईल. अनुसूचित जाती/ जमातीच्या व्यक्तींस ५,००० हजार रुपये इतकी अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे.

अर्जांची छाननी दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय येथे करण्यात येईल. त्यानंतर दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप करण्यात येईल.

अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत केवळ ४ व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात मोबाईलच्या वापरावर बंदी आहे. सर्व नागरिकांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.




मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारास एक सूचक तर इतर उमेदवारांसाठी १० सूचक असणे आवश्यक आहे. केवळ मतदारसंघातील मतदार सूचक असू शकतात.




उमेदवाराचा प्रचार खर्च हा २८ लाखाच्या मर्यादेत असावा. यासाठी त्यांनी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक प्रचारावरील खर्च दिलेल्या नमुन्यात निवडणूक खर्च कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे.




राजकीय पक्षांना व उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत विहित नमुन्यात प्रसिद्धी द्यावी लागणार आहे.

निवडणूक विषयक विविध परवानग्यांकरिता तहसील कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post