राष्ट्रवादीला मोठा धक्का ; अखेर उदयनराजेंनी केला भाजपात प्रवेश




माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. “2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती. 2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठं यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशान सर्व खुष आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.



“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे उदयनराज यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही उदयनराजेंनी मोदींची साथ दिली होती. उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करत असल्यानं युवकांचं त्यांच्यावर मोठं प्रेम आहे. त्यांच्या येण्यानं भाजपाची ताकद वाढली आहे,” असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच यावेळी चंद्रकांत पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं. “उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तसंच ते साताऱ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ते अन्य पक्षाशी जोडलेले असले तरी भाजपाशी उत्तम संबंध आहेत,” असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

यापूर्वी 1995 मध्ये उदयनराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला त्यांचा फायदा न झाल्यानं त्यांना भाजपानं दूर केलं होतं. शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,” असं त्यांनी यात म्हटलं होतं.

गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत उदयनराजे यांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं आहे असं म्हटलं जात होतं. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं होतं. यामुळे नेमकं काय होणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. पण अखेर चर्चेला पूर्णविराम मिळाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post