श्रीगोंदयात त्रागडं ; जगताप, पाचपुते, नागवडे पैकी कोणाचा होणार पत्ता कट!



निलेश आगरकर / माय नगर
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येकजण कामाला लागला आहे. श्रीगोंदे मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते भाजपचे दावेदार असले तरी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे किंवा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सभापती अनुराधा नागवडे आणि राष्ट्रवादीचे आ.राहल जगताप हे देखील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

राजकारणात भाजपचे बळ वधारल्याने या पक्षात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. श्रीगोंदे मतदारसंघ देखील त्यास अपवाद नाही. तालुक्यात सत्तेचे गणित नेहमीच नागवडे, पाचपुते, जगताप या तीन कुटुंबांभोवती फिरत असते. आ.जगताप व पाचपुते यांनी प्रचाराला सुरूवात केली असली, तरी आ.जगताप कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील, याबाबतची साशंकता कायम आहे. त्यांनीही आपल्या प्रचाराचा रोख पाचपुते यांच्या विरोधातच ठेवला आहे. सत्ताधारी भाजपवर टीका करण्याचे ते सध्या टाळत आहेत. २०१४ च्या निवडणुकीतील वातावरण आता बरेच बदलले आहे. त्यावेळी पाचपुते यांच्या विरोधात तालुक्यातील सर्वच प्रमुख नेते होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले असले, तरी श्रीगोंदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (स्व.) शिवाजीराव नागवडे यांनी आ.राहुल जगताप यांच्यासाठी प्रचार केला. आता मात्र पाचपुते विरोधातील आघाडी बऱ्यापैकी खिळखिळी झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत पाचपुते विरोधक आणि पाचपुते मांडीला मांडी लावून बसल्याचे तालुक्याने पाहिले आहे. भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते स्पर्धेत आहेत. आ.जगताप राष्ट्रवादीचे असले, तरी ते देखील यासाठी प्रयत्नात असल्याची चर्चा झडत आहे. तसेच राजेंद्र नागवडे हे देखील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे. या दोघांना तुम्ही तुमच्यात एकमत करा, असा सल्ला भाजप नेत्यांनी दिल्याचे समजते. मात्र दोघांनाही उमेदवारी हवी असल्याने हे एकमत होणे अशक्य असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. भाजप आणि शिवसेना यांची युती फिस्कटली तर शिवसेना आ. जगताप यांना उमेदवारी देण्यास तयार असल्याची चर्चा आहे. आमची गाडी सुटायच्या आत गाडीत बसा, मागे पळून काही मिळणार नाही, अशा भूमिकेत भाजप नेते असल्याने सर्वच प्रमुख नेत्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. नागवडे आणि जगताप सावध भूमिका घेत आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नागवडे यांचे नाव चर्चेत आले. त्यांनी श्रीगोंदे दौऱ्यात नागवडे व आ.जगताप यांच्याशी बंद खोलीत चर्चाही केली होती. मात्र अद्याप चित्र स्पष्ट नाही. नागवडे स्वतः किंवा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांच्यासाठी इच्छुक आहेत .


प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून
 नागवडे यांचे जवळचे नातेवाईक असलेले भाजपचे मंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्यामार्फत नागवडे यांच्या सर्व हालचाली सुरू असल्याचे समजते. भाजपने उमेदवारी देताना महिलांची संख्या वाढविण्याचे ठरविल्याने अनुराधा नागवडे यांच्यासाठी ही फिल्डिंग असल्याचे बोलले जाते. मात्र नागवडे यांच्या या प्रयत्नांची स्थानिक भाजप नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post