आ. जगताप पक्षप्रवेशाच्या चर्चेने नगरी राजकारण हँग ; युतीवर राठोडांचे भवितव्य


माय नगर वेब टीम

अहमदनगर -  नगर शहर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा चर्चेत आले आहे. आमदार संग्राम जगताप नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार याबाबत भल्या भल्यांना अद्यापही अंदाज यायला तयार नाही. जगताप यांच्या शिवसेना, भाजपाच्या चर्चा सुरू असल्यामुळे नगरचे राजकारण हँग झाले आहे. कोणी कोणत्याही पक्षात गेले तरी नगरची लढाई मात्र जगताप- राठोड यांचीच होणार आहे. तिरंगीत कळमकरांचेही आव्हान असू शकते. निवडणुकीत भाकप, आप, एमआयएम, वंचित उतरल्यास याचा फटका कोणाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आ. जगताप यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल न करण्याचे आवाहन केले आहे.

ऐनवेळी तुटलेली भाजप - शिवसेनेची युती अन युतीच्या मतात झालेली विभागणी यामळे २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणकीत सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत विजयाची गुढी उभारणारे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना काठावर पराभव स्वीकारावा लागला. तब्बल पंचवीस वर्षांनंतर नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले.

एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही, अशी परंपरा असलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघात सलग पंचवीस वर्षे आमदारकी टिकविण्याचा रेकॉर्ड राठोड यांच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड युती असल्यामुळे होत असल्याचे २०१४ साली सिद्ध झाले. त्यावेळी पंचवीस वर्षे असलेल्या युतीत खोडा निर्माण झाला आणि शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात लढले. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप काठावरील मतांनी विजयी झाले. आ . जगताप यांना ४९ हजाराच्या आसपास, राठोड यांना ४६ हजार व भाजपचे उमेदवार अॅड.अभय आगरकर यांना ३९ हजार मते मिळाली. चौथ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित तांबे यांना २७ हजारांवर मते मिळाली. सलग पंचवीस वर्षे आमदार असल्यामुळे राठोड यांच्या विरोधात मतदारात नसली तरी युतीमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या काहीनगरसेवकांनी राठोड यांच्या विरोधात गोपनीय उद्योग केल्याची चर्चा आहे. तसेच त्यावेळी खासदार असलेले दिलीप गांधी यांनी राठोड यांच्यासह भाजपचे उमेदवार अॅड.आगरकर यांच्या विरोधातही काम केलं. याचा फायदा जगताप यांना झाला. शिवाय यावेळी ही आमदार व्हायचेच, इराद्याने २०१४ मध्ये रिंगणात उतरलेल्या आ.जगताप यानी निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व ' बाबींचा ' यथोचित वापर केला. पर्यायाने पंचवीस वर्षांनंतर युती विरोधातील पक्षाला येथे स्थान मिळाले. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहन गेले आहे. आ.जगताप यांच्या पक्षांतराच्या चर्चा अनेकदा रंगल्या. ते राष्ट्रवादीचेच का , याबाबत साशंकता व्यक्त होते. राठोड यांनी पुन्हा एकदा शहरात जोरात संपर्क मोहीम राबविली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याशी संघर्ष करत त्यांनी एक हाती सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची किमया केली . शिवाय वरिष्ठ पातळीवर युती होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शहरात राठोड आणि युती यांना मानणारा वर्ग मोठा आहे. मागीलवेळी राठोड यांच्या विरोधात लढलेले अॅड.आगरकर आणि राठोड यांच्यात आता दिलजमाई झालेली आहे. मात्र भाजपमधील दिलीप गांधी गट अद्यापही राठोड यांच्या विरोधात बाह्या सावरून आहे. एवढेच नव्हे, तर आ. जगताप यांच्याशी त्यांचे व त्यांच्या समर्थकांचे चांगले सुत आहे. शिवसेनेत कधी नव्हे ती यावेळी उमेदवारीसाठी स्पर्धा होत आहे. त्याचेही आव्हान राठोड यांच्यासमोर आहे.


आ. जगताप यांचा पक्ष कोणता?
आ. जगताप यांचा पक्ष कोणता , असा प्रश्न असल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यात ते व त्यांचे समर्थक अपयशी ठरले आहेत. शिवाय मध्यंतरी केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी त्यांच्यावर असलेला आरोप त्यांच्यासाठी मोठा अडसर ठरणार आहे.
कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनीही संपर्क मोहीम सुरू केलेली आहे. अशा वातावरणात युती झाली आणि राठोड उमेदवार असतील तर आ. जगताप यांना त्यांना तोंड देणे अवघड मानले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post