नगर तालुका ठरवतो तीन आमदार ; आ. कर्डिले, आ. जगतापांना आव्हान, 'संदेश'ने वाढवली ना. औटींची डोकेदुखी






निलेश आगरकर / माय नगर

सन २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघात विभाजित झालेल्या नगर तालुक्यातील भूमिकाच या तीनही मतदारसंघांत निर्णायक ठरते. दोन जिल्हा परिषद गटाच्या जोरावर आमदार शिवाजी कर्डीले यांनी दोनदा बाजी मारली. तसेच ना. विजय औटी व आ. राहुल जगताप यांनाही नगर तालुक्यातील गावांनीच लीड दिले आहे. मात्र तीन तीन आमदार असूनही तालुक्याचे प्रश्न मात्र कायम आहेत हे भयाण वास्तव आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत आमदार कर्डिले यांना गोविंद मोकाटे, शरद झोडगे, अनिल कराळे यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर पारनेर मतदारसंघात ना. औटी यांना त्यांच्याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी उमेदवारीसाठी मतदारसंघ पिंजून काढून आखाड्यात उतरण्यासाठी दंड थोपटल्याने अडचणी वाढल्या आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता. श्रीगोंदा, पारनेर, राहुरी या तीनही विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील मतदारांची भूमिकाच निर्णायक ठरली आहे. श्रीगोंदा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नगर तालुका विरोधात आ.राहुल जगताप विजयी होण्यामागे ही नगर तालुक्यातील चाळीस गावाची भूमिका महत्वाची ठरली. नगर तालुक्यातील चाळीस गावामध्ये सुमारे ७५ हजार मतदान आहे. २०१४ मध्ये राज्यात भाजपची लाट पाहून पाचपुते यांनी पक्षांतर केले. त्यामुळे आ.राहुल जगताप यांना सहानुभूती मिळाली. आ.जगताप यांच्या विजयात नगर तालुक्यातील मतांचे विभाजन हा सर्वात मोठा घटक ठरला. तालुक्यातील काही नेत्यांनीही पाचपुते यांना पडद्याआडून शह दिल्याची त्यावेळी चर्चा होती. हा पराभव जिव्हारी लागल्याने पाचपुते यांनी यावेळी मतदारसंघ पिंजून काढतानाच नगर तालुक्यातील गावांवरही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.



विरोधी पक्षात असल्याने विकासकामास निधी मिळत नसल्याची तक्रार आ. जगताप करत असले तरी त्याचा प्रभाव तालुक्यातील मतदारांवर किती पडतो ते काळच सांगेल. पारनेर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी होणारे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या दृष्टीने ही निवडणूक काहीशी वेगळी आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे. या मतदारसंघात नगर तालुक्यातून राष्ट्रवादीकडून माधवराव लामखेडे, शिवसेनेतर्फे




जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, काँग्रेसकडून प्रताप शेळके या जिल्हा परिषद सदस्यांनी मतदारसंघात एकत्रित मेळावे घेऊन तिघांपैकी ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या निवडणुकीत लामखडे यांनी अपक्ष लढत देत सुमारे ४६ हजार मते मिळवली. मध्यंतरी पारनेर तालुक्यातील काही नेत्यांनी लामखडे, शेळके, कार्ले यांच्यासमवेत बैठका घेऊन तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा केल्याचे समजते. संदेश कार्ले यांची उमेदवारी अनेकांची गणिते बिघडवणारी आहे.




 राहुरी मतदारसंघात नगर तालुक्यातील जनतेने कायम आ.
शिवाजी कर्डिले यांना साथ दिली. पण यावेळेस त्यांना मानणारे जिल्हा परिषद गट शिवसेनेने खेचून घेतले आहेत. नगर तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस विरुद्ध आ. कर्डिले असा संघर्ष आहे. पांगरमल दारूकांडात तालुक्यातील काही नेत्यांच्यामागे ससेमिरा लागलेला आहे. यामागे आ . कर्डिले यांचाच हात असल्याचा आरोप होत आहे. शिवाय मागीलवेळी त्यांच्यासमवेत असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यावेळी त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यामुळे यावेळीही नगर तालुक्याची भूमिका राहुरी मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघातही नगर तालुक्यातील गावांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.



श्रीगोंद्यात 'साकळाई' मुद्दा महत्वाचा 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपूर्वी साकळाईला प्रशासकीय मंजुरी मिळेल असे जाहीर सभेत आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण झाले नाही. साकळाई चा पूर्वी ही आणि आताही राजकारणासाठीच वापर होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी श्रीगोंदा मतदारसंघातील नगर तालुक्यातील गावे निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. याचा फटका आ. जगताप यांना बसतो की माजी मंत्री पाचपुते यांना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  साकळाई उपसा सिंचन योजनेचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कार्यवाही यात फरक असल्याने त्याचाही रोष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही तालुक्यात मोठे आहे. एकाच महिन्यात पाच जणांनी आत्महत्या केल्याने तीन आमदार असूनही तालुका पोरका असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post