आमदार कर्डिले यांच्या रस्त्यात काटे; त्यांच्या उमेदवारीला 'यांचा' विरोध


माय नगर वेब टीम

अहमदनगर - राहुरी - नगर मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आ. कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकरराव राऊत, मिलिंद मोभरकर आणि अमोल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. दरम्यान, आ. कर्डिले यांना उमेदवारी दिल्यास राज्यातील जनतेला मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे असणारे आ. कर्डिले यांना मुख्यमंत्री यांनी पाठीशी घालू नये. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना भाजपाने तिकीट देऊ नये अशी मागणी नगर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची महाजनादेश यात्रा 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नगर जिल्ह्यात येत असून राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन मिलिंद मोभरकर आणि अमोल जाधव शंकर राऊत यांनी ही मागणी केली आहे.

कर्डिले यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही ते पक्षाचे आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून आपला आमदार कसा निर्दोष सुटेल याची काळजी घेतल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. राहुरी मतदार संघातून कर्डिले यांना उमेदवारी दिली तर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला. मुख्यमंत्री हेच गुन्हेगारी प्रवृत्ती च्या आमदारांना पोसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अपक्ष- काँग्रेस- राष्ट्रवादी- भाजप असा राजकीय प्रवास करीत पाच वेळा आमदार झालेल्या आ. कर्डिले यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत खुनापासून ते पाणी चोरी, मतदारांना पैसे वाटपापर्यंत सुमारे दीड डझन गुन्हे दाखल आहेत.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आ. कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post