' त्या ' शेतकर्याची जनावरे चारा छावणीत कधीच दाखल नव्हती ; प्रशासनाचा खुलासा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शेतकर्यांची गरज आणि मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु केल्या. त्यामुळे चारा छावणी सुरु न केल्याने शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रचार चुकीचा आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित शेतकरी घोसपूरी येथील असून त्याच्याकडे असणारे जनावरे त्याने यापूर्वी सुरु असलेल्या कोणत्याही छावणीत कधीही दाखल केले नव्हते, ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर याने चारा छावणी सुरु न केल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे काहीजणांचे म्हणणे होते. मात्र, वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. ऐन उन्हाळ्यात चारा छावणी सुरु असतानाही झरेकर यांची जनावरे चारा छावणीत दाखल केलेली नव्हती, असे दिसून येते. आज घडीला घोसपुरी येथील छावणी सुरु असून तेथे ५७३ जनावरे दाखल आहेत. यात ४८ लहान तर ५२५ मोठी जनावरे दाखल आहेत. त्यामुळे झरेकर यांच्या आत्महत्येसंदर्भात प्रशासनावर ठपका ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा प्रशासन अतिशय संवेदनशील असून चारा छावणी असो की, शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्यावर तात्काळ कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रचाराला बळी पडू नये आणि जिल्ह्यातील वातावरण दुषित होणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात सध्या १९९ चारा छावण्या सुरु असून दाखल जनावरांची संख्या १ लाख ४ हजार ४०७ इतकी असून यात ११ हजार ५०८ लहान तर ९२ हजार ८९९ मोठी जनावरे आहेत. नगर (२७), जामखेड (१९), पारनेर (३४), कर्जत (५७), पाथर्डी (३१), श्रीगोंदा (०६), शेवगाव (२४), संगमनेर (०१) अशी छावण्यांची संख्या आहे. दरम्यान, संगमनेर येथील छावणी दिनांक ०१ ऑगस्ट रोजी बंद करण्यात आली आहे.
Post a Comment