माय नगर वेब टीम
अहमदनगर - छावणीच्या कारणामुळे नगर तालुक्यातील घोसपुरी येथील वसंत सदाशिव झरेकर (वय-50), या शेतकर्याने वीष प्राशान करुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी घडली. आत्महत्तेस छावणीचेच कारण असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
पावसाळा सुरु होवून दोन महिने उलटले तरी अद्याप नगर तालुक्यातील दुष्काळ हटलेला नाही. परिणामी जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरु आहेत. दरम्यान, दोनदा सरकारने छावण्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच छावणी चालकांनी छावण्यांमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे नगर तालुक्यातील चार चारा छावण्यांची मान्यता रद्द केली होती. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे असा प्रश्न शेतकर्यांसमोर पडला होता. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे महामार्गावर बायपास चौकात शेतकर्यांनी जनावरांसह रास्तारोको आंदोलन केले.
पोलिसांनी 50 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नगर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन दिवस केलेल्या आंदोलनानंतर तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याच्या इशार्यानंतर प्रशासनाने मान्यता रद्द केलेल्या छावण्या पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले. दरम्यान शेतकर्यांनी विष घेवून सामुहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला होता.
शिवसेनेच्यावतीने छेडण्यात आलेल्या या आंदोलनात वसंत झरेकरही उपस्थित होता. तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता. छावणीत वाढीव जनावरे घेतली नाहीत म्हणून झरेकर यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
अधिकार्यांवर गुन्हे नोंदवा अन्यथा कचेरीसमोर अत्यंसंस्कार!
नगर तालुक्यातील घोसपुरी येथील वसंत सदाशिव झरेकर या शेतकर्याने छावणीच्या कारनांमुळे विषारी औषध घेवून आत्महत्या केली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या अधिकार्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करणार असल्याचा इशारा नातेवाईकांसह जिल्हा परिषदचे सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी दिला आहे.
Post a Comment