शिवसेना नमली नाही तर भाजप तोडेल युती


निलेश आगरकर / माय नगर

काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हवा पार बदलली आहे. दोन महिन्यांनंतर  होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने लाट असणार आहे. ह्या लाटेत दोन्ही काँग्रेसच काय इतरही वाहून जाणार आहेत. शिवसेनेला सोबत घेण्याची गरज आता भाजपला उरली नाही. युती केली नाही तरी भाजपला स्वबळावर सहज बहुमत मिळू शकते, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करायची की नाही? शिवसेनेचे लोढणे अडकून घ्यायचे की स्वबळावर पक्ष वाढवायचा? भाजपच्या उच्च वर्तुळात हा विचार सुरू झाला आहे. शिवसेनेतही धाकधूक वाढली आहे. शिवसेनेला आता बॅकफूटवर राहावे लागणार आहे.

पुढचा मुख्यमंत्री कुणाचा? तसेच जागावाटपावरून युतीत तणाव आहेच. ‘मी पुन्हा येईन’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. २०१४च्या निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपने १२३ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. मित्रपक्षात भाजपचे ८ आमदार आहेत. ह्या १२३ आणि ८ जागा मिळून १३१ जागा होतात. सेनेचे ६३ मिळवले तर १९४ जागा होतात. विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. गेल्या वेळी जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाकडे ठेवायच्या आणि उरलेल्या ९४ जागा निम्म्या-निम्म्या वाटून घ्यायच्या असा भाजपचा आग्रह आहे. जागावाटपाचे ‘सीटिंग-गेटिंग’चे हे सूत्र शिवसेनेला कितपत पसंत पडते तो प्रश्नच आहे. कारण यात शिवसेनेचा घाटा आहे; कारण शिवसेनेला फक्त ११० जागाच लढायला मिळतात. भाजपला मात्र १७० जागा लढायला मिळणार आहेत. पुढच्या आठवड्यात जागावाटपाची बोलणी सुरू होणार असल्याची माहिती आहे; पण ११० जागा लढवून
मुख्यमंत्रिपद खेचणे शक्य नाही हे शिवसेनेला समजते. त्यामुळे युतीच्या जागावाटपाचा घोळ बराच काळ चालणार आहे;

पण शिवसेनेला युती करण्याशिवाय पर्याय नाही. यावेळी शिवसेना नेते नखरे करू शकणार नाहीत. नखरे केले तर युती तुटते. तसे झाले तर सेनेचेच नुकसान आहे. काश्मीरच्या हवेमुळे भाजप सहज सत्तेपर्यंत पोचतो. शिवसेना ५० जागांच्या आसपास राहील. उद्धव ठाकरे यांना हवेची कल्पना आहे. उद्धव आणि देवेंद्र यांच्यात चांगले ट्युनिंग आहे. त्यामुळे युती टिकेल; कारण सेनेची ती गरज आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा करार झाला होता, असे सेना नेत्यांकडून सांगितले जात होते; पण तो करार लोकसभा निवडणुकीपुरता होता असे आता बाहेर आले आहे. नेमके काय झाले ते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव आणि अमित शहा यांना ठाऊक असल्याने बाहेर नुसती चर्चा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post