माय नगर वेब टीम
अहमदनगर – महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत शहरासह उपनगरांतील व्यावसायिकांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. नवीपेठ, सावेडी भागासह बोल्हेगाव परिसरात महापालिकेच्या पथकांनी दुकानांमध्ये छापे मारुन 80 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. या कारवाईत 39 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मागील आठवड्यापासून महापालिकेने प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारतानाच बडे व्यापारीही आता टारगेट केले आहेत. दोन दिवसांपासून या मोहिमेला वेग आला असून, मध्य शहरासह आता सावेडी, नागापूर व बोल्हेगावातही यामुळे खळबळ उडाली आहे.
माळीवाडा कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यांच्या पथकाने दिनेश सारीज्, क्रेझी कलेक्शन, साईनाथ बॅग हाऊस, महाराणी साडी, सोनू बॅग हाऊस, न्यू फातमा ड्रेसेस आदी दुकानांमध्ये छापे टाकून 50 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. या दुकानदारांना 30 हजार 200 रुपयांचा दंड आकारला.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील महिला कर्मचार्यांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छतेबाबत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आदेश काढले होते. त्यानुसार महापालिका आवारात थुंकणार्या तिघांना 200 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेची कारवाई सुरू झालेली समजताच अनेकांनी महापालिकेतून काढता पाय घेतला.
Post a Comment